सोनू सुदचं कौतुक कोण करत होतं? संजय राऊतांचा सवाल

मुंबई : देशभरात करोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. सोनू सूद लोकं बाहेर पाठवत आहे म्हणून कौतुक कोण करत होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र सरकार कशा प्रकारे काम करते याचे दाखले हे सुप्रीम कोर्टाने इतर राज्यांना दिले. त्यामुळे हा महाराष्ट्राच्या जनतेचा, लोकनियुक्त सरकारचा, करोनाकाळात सातत्याने काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा अपमान आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील महाराष्ट्रातील धारावी पॅटर्नचे कौतुक केले होते. पंतप्रधानांचे भाषण ऐकताना माझ्याकडून काही चूक झाली का म्हणून मी ते वाचले. पंतप्रधानांनी महाराष्ट्रासंदर्भात केलेल्या उल्लेखावर महाराष्ट्र सरकारनेच याचा खुलासा करायला हवा. मला हे ऐकून वाईट वाटलं,”अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

महाराष्ट्रावर हा ठपका ठेवण्याचा प्रयत्न झाला तो चुकीचा आहे. त्यावेळी सोनू सूदला राजभवनात नेऊन राज्यपालांच्या हस्ते सत्कार करणारे कोण होते? सोनू सूद लोकं बाहेर पाठवत आहे म्हणून कौतुक कोण करत होते? आम्ही करत नव्हतो. उलट आम्ही घाई करु नका असे म्हणत होतो. त्यामुळे याप्रकरणी सविस्तर भूमिका राज्य सरकारनेच मांडायला हवी,” असेही संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी पुढे येऊन याच्यावर बोलायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



