FRAUD : पार्टनरशीपच्या नावाने दोन कोटींची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीस अटक

पुणे : कंपनीच्या डिलरशीपमध्ये पार्टनरशीप देतो, असे म्हणून दोन कोटींची फसवणूक करणाऱ्या मागील एक वर्षापासून फरार असणाऱ्या एका आरोपीस सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. संतोष चिंचवडे (रा.बाणेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संतोष चिंचवडे, रोषणा संतोष चिंचवडे, अर्चना जगताप यांच्या विरोधात रमेश गायकवाड, जयंत लिमये, सदाशिव कुलकर्णी, प्रतीक राणवाडे, बबन रासकर, युवराज धनकुडे यांनी त्यांची दोन कोटींची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल आहे. फिर्याद दाखल झाल्यावर हे तीन आरोपी फरार झाले होते. या आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आरोपींपैकी अर्चना जगताप यांना जामीन मंजूर झाला. रोषणा चिंचवडे आणि संतोष चिंचवडे यांना जामीन मंजूर झाला नाही. त्यानंतर आरोपी संतोष चिंचवडे हा फरार झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीचा माग काढत आरोपीला अटक केली. आरोपी संतोष चिंचवडे याला न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आरोपी रोषणा चिंचवडे अद्याप फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.




