पुणे शहर

विश्रांतवाडीत साकारणार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा 

शासनाच्या सर्व परवानग्या झाल्या पूर्ण, आंबेडकरी चळवळीच्या धम्मदानातून उभारण्यात येणार महामानवाचा पुतळा

पुणे – आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे शहरातील ऐतिहासिक विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर मुख्य चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा येत्या वर्षभरात बसविण्यात येणार आहे. पुतळ्यासाठी आवश्यक शासनाच्या सर्व परवानग्या पूर्ण झालेल्या असून, आंबेडकरी चळवळीच्या सर्व समाज बांधवांच्या वतीने लोकवर्गणीतून हा महामानवांचा पुतळा साकारण्यात येणार असल्याची माहिती, नियोजित पुतळा समितीचे समन्वयक माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक कांबळे,सामाजिक कार्यकर्ते निखिल गायकवाड, राजेश बेंगळे, शिल्पकार राजेंद्र आल्हाट उपस्थित होते.

Fb img 17803875442192531368419001118856


विश्रांतवाडी परिसराला आंबेडकरी चळवळीचे मोठे ऐतिहासिक योगदान लाभल्यामुळे या ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी स्थानिक सर्व समाज बांधवांची मागील अनेक वर्षांपासून ची इच्छा होती. सन 2018 मध्ये जयंती उत्सवानंतर पुतळ्यासाठी जन आंदोलन पुकारण्यात आलेले होते. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांच्या समन्वयातून महामानवांचा पुतळा हा शासनाच्या सर्व अटी शर्ती व नियमांचे पालन करून बसविण्यात यावा असे ठरविण्यात आले. त्यानुसार माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी विश्रांतवाडी मुख्य चौकातील ग्रेट सेपरेटर व उड्डाणपुलाच्या दर्शनी भागामध्ये महामानवांचा पुतळा उभारण्यात यावा असा ठराव पुणे महापालिकेत मांडलेला होता. ठरावाची कार्यवाही वर्षभरात पूर्ण न झाल्यामुळे सदरचा ठराव हा रद्द झाला.

Img 20260222 wa00063650015197115571458

त्यानंतर सन 2023 मध्ये विश्रांतवाडी मुख्य चौकातील ग्रेट सेपरेटर व उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या वेळी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या पुतळ्याबाबत स्थानिक आंबेडकरी संस्था संघटनांच्या वतीने कार्यकर्त्यांनी निवेदन दिले होते. सन 2022 ते 2026 पुणे महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरू होता. त्यामुळे तत्कालीन महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सन 2025 रोजी पुन्हा हा ठराव महापालिका प्रशासनाच्या वतीने मंजूर केला. दरम्यान त्यानंतर पुतळ्याच्या इतर आवश्यक परवानगीच्या कामाला सुरुवात झाली. नियोजित पुतळा समितीचे समन्वयक माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, आमच्या सोबतच विश्रांतवाडी परिसरातील विविध संस्था संघटना व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी वेळोवेळी यासाठी पाठपुरावा सुरू केलेला होता. त्यानुसार पुणे महापालिकेच्या पथ, प्रकल्प, बांधकाम, डीपी या सर्व विभागांसह,मेट्रो सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग, व संरक्षण विभाग या सर्वांच्या परवानगी आवश्यक होत्या. त्याचा सातत्याने पाठपुरावा आम्ही सर्वांनी केला. मागील तीन महिन्यांपूर्वी सर्व प्रशासकीय पाठपुरावा झाल्यानंतर विविध खात्याकडून “ना हरकत प्रमाणपत्र” NOC देण्यात आले.


विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर मुख्य चौकात सुरू असणाऱ्या ग्रेड सेपरेटर व उड्डाण पुलाच्या कामाचे ठिकाणी पुतळ्याची जागा निश्चिती करत असताना महापालिका आयुक्त तसेच इतर सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली. तत्कालीन शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी मुख्य चौकातील मध्यभागी ग्रेड सेपरेटर च्या वरती नऊ बाय नऊ आकाराच्या पूर्ण क्षमतेच्या जागेवर पुतळा उभारण्यास हरकत नसल्याचे सांगितले. त्यानुसार सर्व पुतळ्यासाठीचा चौथरा, प्रत्यक्ष पुतळा तसेच त्या परिसरात करण्यात येणाऱ्या इतर स्थापत्य विषयक कामांच्या वजनाची क्षमता लक्षात घेऊन त्या पद्धतीने सर्व आवश्यक त्या सुरक्षिततेची पुतळ्याच्या जागेवर स्लॅबची उभारणी करण्यात आली. महापालिका आयुक्तांच्या परवानगीने पुतळ्याच्या इतर कामांसाठी वास्तु विशारदाची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांनी दिलेल्या कोटेशन नुसार सदर पुतळ्याच्या ठिकाणी चौथरा व इतर आवश्यक कामांसाठी नगरसेविका नंदिनीताई धेंडे व नगरसेवक रवी टिंगरे यांनी 65 लाख रुपये निधी वर्गीकरणातून उपलब्ध करून दिलेला आहे.


पुतळा उभारण्यासाठी तीन नामांकित संस्थांकडून कोटेशन मागवण्यात आलेले होते. यामधील सर्वात कमी दराचे कोटेशन विश्रांतवाडी येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार राजेंद्र आल्हाट यांनी सर्वात कमी दराच्या कोटेशन मधील 20% आणखी कमी दराने कोणताही व्यावसायिक मोबदला न घेता केवळ आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून सदरच्या पुतळ्याचे काम स्वीकारले. त्याबाबतचा राज्याच्या कला संचलनालाय याबरोबर पत्र व्यवहार करण्यात आला. महामानवांचा पुतळा सुमारे 22 फूट उंचीचा तसेच तीन ते साडेतीन टन ब्रांच धातूचा असून त्यासाठी अंदाजे आजच्या दरानुसार 20% एकूण कामाची सवलत देऊन 80 ते 85 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये कामाचा कोणताही मोबदला न घेता दर आकारण्यात आलेला आहे.


शासनाच्या पुतळा विषयक नियमावलीप्रमाणे, सर्व महापुरुषांचे पुतळे हे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या शासकीय समितीच्या माध्यमातून उभारण्यात येतात. केवळ पुतळा हा लोकवर्गणीतून स्थानिक प्रशासनाला हस्तांतरित करण्यात येतो. त्यासाठी कुठलाही निधी शासनाकडून देण्यात येत नाही.


आता प्रत्यक्षात पुतळा उभारणीसाठी शासनाकडून सर्व परवानग्या मिळाल्यानंतर महामानवांचा हा ऐतिहासिक पुतळा आंबेडकरी जनतेच्या लोकवर्गणीतून पारदर्शक रित्या पुणे महापालिकेला हस्तांतरित करण्यात येणार आहे. तसेच पुतळ्यासाठी चा निधी हा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये नोंदणीकृत शिल्पकार आल्हाट यांच्याच कंपनीचे खात्यावर केवळ ऑनलाइन स्वरूपात स्वीकारण्यात येणारा आहे. मागील महिन्याभरात समाज बांधवांच्या लोकवर्गणीतून सुमारे पाच लाख रुपये निधी आत्तापर्यंत खात्यावर जमा झालेला आहे. देणगीदार आपला निधी हा सदरच्या अधिकृत खात्यावर ऑनलाइन स्वरूपात किंवा थेट बँकेत जाऊन भरू शकतात. या कामांमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता असावी म्हणून रोख स्वरूपात पैसे गोळा न करता सर्व रक्कम ही ऑनलाइन स्वरूपातच जमा करण्यात येणार आहे. दर महिन्याच्या अखेरीस खात्यावर जमा झालेला निधी हा समाज माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे त्यामुळे जमा झालेल्या निधीबाबत देखील पारदर्शकता राहणार आहे.
एकंदरीतच आंबेडकरी जनतेच्या सर्व कार्यकर्ते व समाज बांधवांना एकत्र घेऊन महामानवांचा हा ऐतिहासिक पुतळा विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौकात येत्या वर्षभरात सन्मानपूर्वक उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महामानवांच्या पुतळ्याच्या विषयांमध्ये कोणतेही गैरसमज कोणामध्येच नाहीत. सर्व समाज बांधव या विषयांमध्ये एकत्र आहेत.पुणे शहरासह राज्यातून तसेच परदेशातून देखील आंबेडकरी चळवळीच्या सर्व संस्था संघटना राजकीय पक्ष, शासकीय तसेच निवृत्त अधिकारी, उद्योजक व्यावसायिक व प्रतिष्ठित व्यक्ती अशा सर्वांनीच महामानवांच्या पुतळ्यासाठी धम्मदान देऊन या ऐतिहासिक कार्यात मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.

Fb img 17803875442192531368419001118856

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये