अभिनेता सलमान खानला सर्पदंश; पनवेलमधील फार्महाऊसमधील घटना

मुंबई : बॉलिवूडमध्ये भाईजान म्हणून ओळख असलेला अभिनेता सलमान खान सर्पदंश झाल्याची माहिती समोर आली आहे.
सलमान खान हा त्याच्या पनवेलमधील फार्महाऊसमध्ये असताना त्याला सर्पदंश झाला. दरम्यान, सलमानला साप चावल्यानंतर त्याला पहाटे साडेतीन वाजता कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारांनंतर सलमान खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
सलमान खानचे पनवेलमधील वाजेपूर येथे अर्पिता फार्महाऊस आहे. या फार्महाऊसवर सलमान विश्रांतीसाठी तसेच मित्रमंडळींसोबत येत असतो. दरम्यान, याच फार्महाऊसमध्ये सलमानला सर्पदंश झाला. त्यानंतर तातडीने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती उत्तम असल्याने त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. मिळत असलेल्या माहितीनुसार सलमान खानला चावलेला साप हा बिनविषारी होता. त्यामुळे सलमानच्या प्रकृतीवर त्याचा फारसा विपरित परिणाम झालेला नाही.




