पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेबाबत काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी..

नवी दिल्ली : पुण्यातील प्राच्यविद्या क्षेत्रात जागतिक कीर्तीची संशोधन संस्था अशी मान्यता पावलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या विविध उपक्रमांची प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “माझ्या प्रिय देशवासियांनो अशातच माझे लक्ष एका लक्षवेधी प्रयत्नाकडे गेलं. हा प्रयत्न आपले प्राचीन ग्रंथ आणि सांस्कृतिक मूल्यांना केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय बनवण्याचा आहे. पुण्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे. या संस्थेत परदेशातील लोकांना महाभारताच्या महत्वाची ओळख करून देण्यासाठी ऑनलाईन कोर्स सुरू करण्यात आला आहे. तुम्ही हे जाणल्यानंतर थक्क व्हाल, हा कोर्स भलेही आता सुरू केला गेला आहे मात्र यामध्ये जे शिकवलं जातं, ती माहिती गोळा करण्याची सुरूवात १०० वर्षांपेक्षाही अगोदर झाली होती.
जेव्हा संस्थेने याच्याशी निगडीत अभ्यासक्रम सुरू केला, तेव्हा त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मी या जबरदस्त प्रारंभाची चर्चा यासाठी करतोय, कारण लोकांना माहिती व्हावी की आपल्या परंपरेच्या विविध पैलूंना कशाप्रकारे आधुनिक पद्धतीने सादर केले जात आहे. सातसमुद्रापार बसलेल्या लोकांना याचा लाभ कसा मिळेल, यासाठी देखील नवनवीन पद्धतींचा अवलंब केला जात आहे.”




