पुणे शहर

शिवभोजन केंद्रांना टाळे; पुणे शहरातील ३२, ग्रामीण भागातील ४३ केंद्रे बंद

पुणे : महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून ‘शिवभोजन थाळी’ योजनेच्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील ३२, तर उर्वरित ग्रामीण भागातील ४३ अशा तब्बल ७५ केंद्रांना विविध कारणांनी टाळे लागले आहेत. काही केंद्रांमध्ये गैरव्यवहार झाल्याने कारवाई करण्यात आली आहे, तर काही केंद्र चालकांनी परवडत नसल्याने स्वत:हून या योजनेतून माघार घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ही महत्त्वाकांक्षी योजना होती.

Img 20220924 182515 453

सन २०१९ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पुढाकारातून २६ जानेवारी २०२० पासून गरजूंना केवळ दहा रुपयांत ‘शिवभोजन थाळी’तून जेवण देण्यात येत होते. करोना काळात केवळ पाच रुपयांत शिवभोजन देण्यात येत होते. या योजनेला पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे टप्प्याटप्प्याने शहर अन्नधान्य वितरण विभाग आणि जिल्हा पुरवठा विभागाकडून शहरासह जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रे वाढविण्यात आली. ही संख्या महाविकास आघाडी सरकार कोसळेपर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ८६, तर उर्वरित ग्रामीण भागात ८० शिवभोजन केंद्रे सुरू होती. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून शहरासह जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांची संख्या कमालीची घटली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

शिवभोजन केंद्र चालकांना ‘महा अन्नपूर्णा उपयोजन’द्वारे (ॲप) थाळी वितरण करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक केंद्राला १५० थाळी देण्याचे बंधन घालण्यात आले होते. तसेच थाळीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे ॲपमध्ये छायाचित्र काढण्याचे बंधन आहे. याशिवाय गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचेही आदेश आहेत. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतरही अनेक ठिकाणी जेवण पार्सल देण्यात आले. तसेच जेवणाऱ्या एकाच व्यक्तीची दोन-तीन छायाचित्रे ॲपमध्ये अपलोड करण्यात आली. याशिवाय अनेक केंद्रचालकांनी परवडत नसल्याचे सांगून केंद्रे बंद केली आहेत.

Img 20220910 wa0003

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये