निवडणुकीनंतर पुणे महानगरपालिकेत महापौर राष्ट्रवादीचाच : दिपाली धुमाळ

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या 2022 च्या निवडणुकीनंतर पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर असेल असा विश्वास विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी व्यक्त केला आहे. काल पुणे महानगरपालिकेच्या होणार्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर शहराच्या हिताची कामे करण्यास अपयशी ठरलेल्या सत्ताधारी भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
धुमाळ यांनी म्हंटले आहे की, भारतीय जनता पार्टीने गेल्या पाच वर्षात महानगरपालिकेत केलेला भ्रष्ट कारभार, जलपर्णी काढण्यासाठी 23 कोटींचा खर्च, नदी प्रदूषण, वाहतूक समस्या, रस्त्यांची दुरावस्था, अशा अनेक समस्या व घोटाळे बघता पुणे महानगरपालिकेतील भाजपच्या सत्तेचा शेवट जवळ आला आहे.
राष्ट्रवादी स्वबळावर लढली तरी महापौर राष्ट्रवादीचाच असेल असा विश्वास वाटत असून प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर भाजपच्या गोटात खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या नगरसेवकांना प्रभागातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न देखील सोडवता आले नसल्याने जनता त्यांना घरचा रस्ता दाखवणार हे नक्की असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.




