मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संदीप खर्डेकर यांचे खुले पत्र ; इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा केली व्यक्त..

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांवर नुकतीच शिवसेने कडून टीका करण्यात आली होती. या टीकेला अनुसरून भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून त्या पत्रात त्यांनी १९९० साली घडलेल्या अशाच एका घटनेची आठवण करून दिली आहे. तसेच पुरव्या दाखल त्यावेळचे एक जुने पत्र त्यासोबत जोडले आहे.
खर्डेकर यांनी ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, आपण परम पूजनीय सरसंघचालकांवर केलेली हीन पातळीवरची टीका वाचनात आली. आपण वेळोवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अश्लाघ्य टीका करत असता. खरेतर आपल्या राजकीय वादात रा.स्व.संघाला ओढणे गैर आहे. ( ते ही कोणत्याही प्रकारचे तारतम्य न बाळगता, खालच्या दर्ज्यावर बोलणे तर निषेधार्यच )
ह्या निमित्ताने आपणास 32 वर्षांपूर्वीच्या एका प्रसंगाची आठवण करून देऊ इच्छितो. माझ्यासारख्या हजारो हिंदुत्ववादी तरुणांचे स्फूर्तीस्थान हिंदुहृदयसम्राट आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1990 साली अश्याच प्रकारे रा.स्व.संघ आणि विश्व हिंदू परिषदेवर टीका केली होती. त्यांच्या टिकेला प्रत्युत्तर म्हणून, बलाढ्य अश्या प्रखर हिंदुत्ववादी पतित पावन संघटनेने विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युतीचा पाठींबा काढून घेण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण इतिहास सांगत नाही, मात्र त्यावेळी बाळासाहेबांच्या वतीने शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष प्रदीप रावत यांच्याशी चर्चा केली.

प्रदीर्घ चर्चेनंतर शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी पतीत पावन संघटनेचे तत्कालीन प्रांताध्यक्ष प्रदिप रावत यांना दिलगिरीवजा खुलासा करणारे वरील पत्र जारी केले.(बहुधा आदरणीय बाळासाहेबांच्या जीवनात हा एकमेव प्रसंग असावा की जे बोलले ते शब्द मागे घ्यावे लागले. ) सदर पत्र पुरेसे बोलके असून त्यातील एका वाक्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. यात असे म्हंटले आहे की रा स्व संघ व विश्व हिंदू परिषदेबाबत निंदाव्यंजक टीका करण्याचे आम्हास कुठलेच प्रयोजन नव्हते व नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य गौरवास्पद व आदरास पात्र आहे असे शिवसेनेचे मत आहे.
यावर अधिक न बोलता इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी ही माझ्या सारख्या सामान्य स्वयंसेवकाची आणि सकळ हिंदू समाजाची अपेक्षा असल्याचे खर्डेकर यांनी म्हंटले आहे.






