पुणे शहर

विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाची कास धरणे गरजेचे : डॉ. बबन जोगदंड

बार्टी व सायन्स टेक्नॉलॉजी पार्कच्या विद्यमाने आयोजित प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप!

पुणे : अलीकडे नोकरीच्या संधी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम पूर्ण करून स्वयंपूर्ण बनले पाहिजे. त्यातून ते आत्मनिर्भर होऊ शकतील, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या कौशल्य विकास विभागाचे प्रमुख डॉ.बबन जोगदंड यांनी केले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी व सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील १८० अनुसूचित जातीच्या युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचे प्रमाणपत्र वितरण जागतिक युवा कौशल्य दिनानिमित सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क (STP), CIII केंद्र, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशन, एस. एम. जोशी महाविद्यालय परिसर, हडपसर येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

Img 20260222 wa00063491038201882637992

कार्यक्रमाचे आयोजन बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे (भा.प्र.से.) आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र पी. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अध्यक्षस्थानी एस. एम. जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एकनाथ एस. मुंढे होते. प्रमुख अतिथी म्हणून बार्टीचे कौशल्य विकास विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. संजय अहिवळे, बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक महेश गवई तसेच लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुंदन उपस्थित होते.

Img 20260716 wa00174019426071809112045


या वेळी पुढे बोलताना डॉ. जोगदंड म्हणाले, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्य विकास हेच रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाची कास धरणे गरजेचे आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील १८० अनुसूचित जातीच्या पात्र युवक-युवतींना उद्योग क्षेत्रातील वाढत्या मागणीचा विचार करून अत्याधुनिक आणि पूर्णपणे रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे मोफत व दर्जेदार प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये ग्राफिक डिझायनिंग (Graphic Designing), सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह (Social Media Executive), आयटी हेल्प डेस्क असिस्टंट (IT Help Desk Assistant), डीटीपी – डेस्कटॉप पब्लिशिंग (DTP), ड्रोन सर्व्हिस टेक्निशियन (Drone Service Technician) आणि ईव्ही मेंटेनन्स टेक्निशियन (EV Maintenance Technician) या आधुनिक अभ्यासक्रमांचा समावेश होता. या अभ्यासक्रमांमुळे डिजिटल अर्थव्यवस्था, माहिती तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगासारख्या वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Img 20260716 wa00169085832670487024231

या प्रसंगी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार मिळविलेल्या आणि स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या उमेदवारांनी आपल्या प्रेरणादायी यशोगाथा सादर केल्या. त्यांच्या अनुभवांमुळे उपस्थित युवक-युवतींना कौशल्य विकासाच्या माध्यमातून जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची प्रेरणा मिळाली.

अनुसूचित जातीच्या युवकांच्या सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास विभागचे महत्त्वपूर्ण पाऊल

जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने आयोजित हा उपक्रम अनुसूचित जातीच्या युवक-युवतींसाठी सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाचा प्रभावी मंच ठरला. गुणवत्तापूर्ण आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे युवकांच्या रोजगारक्षमतेत लक्षणीय वाढ होण्यास मदत झाली असून, आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात स्पर्धात्मक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

विशेषतः ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन देखभाल, डिजिटल डिझाईन, सोशल मीडिया व्यवस्थापन आणि आयटी सेवा यांसारख्या भविष्योन्मुख क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण मिळाल्यामुळे अनुसूचित जातीतील युवकांना पारंपरिक रोजगाराच्या चौकटीबाहेर जाऊन उच्च उत्पन्नाच्या आणि कौशल्याधारित करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रशिक्षणामुळे केवळ रोजगारच नव्हे, तर स्वयंरोजगार, स्टार्टअप आणि उद्योजकतेलाही चालना मिळणार आहे.

बार्टीच्या या उपक्रमामुळे संविधानाने अपेक्षित सामाजिक न्याय, समान संधी आणि आर्थिक समावेशनाच्या उद्दिष्टांना बळकटी मिळत असून, कौशल्याधारित विकासाच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या युवकांना आत्मनिर्भर, स्पर्धाक्षम आणि तंत्रज्ञानस्नेही नागरिक म्हणून घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम मैलाचा दगड ठरला आहे.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे व्यवस्थापक वैभव निमगिरे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशनचे व्यवस्थापक आशिष कळस आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे प्रशिक्षण समन्वयक डॉ. मनोज कुलकर्णी यांच्या संयोजन समितीने केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये