भाजप कार्यालय हटवण्याची भीम आर्मीची मागणी
मुंबई : भाजपचे प्रदेश कार्यालय (BJP Maharashtra) अनाधिकृत असून ते तत्काळ हटवा. त्या जागी लता मंगेशकर यांचं स्मारक बांधावं, अशी मागणी भीम आर्मीनं मुंबई पालिका महापौर आणि आयुक्तांना पत्र लिहित केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या या अनाधिकृत कार्यालयाबाबात आम्ही सातत्याने आवाज उठवून तक्रारी करुन देखील अद्याप कारवाई होत का नाही? असा सवाल देखील भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत अनेक झोपड्यांवर कारवाई केली जाते मग भाजपच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई का केली जात नाही, भाजपच्या अनधिकृत बांधकामाला पालिकेने संरक्षण दिले आहे का असा प्रश्नही कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
भाजपचे कार्यालय बेकायदेशीररीत्या बांधण्यात आले आहे. यामुळे त्यावर कारवाई करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव तसेच पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना भीम आर्मीने पत्र दिले आहे. पालिकेने हे बेकायदेशीर बांधकाम त्वरित तोडावे अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी असणाऱ्या अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी विरोधी पक्ष भाजप करत असताना आता त्यांचेच कार्यालय अनाधिकृत आहे, असं म्हणत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रशासन काय कारवाई करते, याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.