फक्त ब्राह्मण म्हणून बाबासाहेब पुरंदरेंना पवारांनी त्रास दिला; राज ठाकरेंचा आरोप

औरंगाबाद : “ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारताच्या घराघरात पोहोचवले. त्या आमच्या बाबासाहेब पुरंदरेंना शरद पवारांनी त्यांच्या वृद्धापकाळात त्रास दिला. बाबासाहेब पुरंदरे केवळ ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना पवारांनी त्रास दिला”, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
“पवारांनी जातीच्या दृष्टीने नेहमी माणसांना बघितलं. आमच्या घराण्यात जातीपातीला थारा नाही. आम्हाला जातीपातीचं देणंघेणं नाही. मी जात बघून एखाद्याकडे जात नाही, जात बघून पुस्तक वाचत नाही”, असंही राज ठाकरे म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं. “दोनच सभा मी घेतल्या, पण या दोन सभांवरुन किती जण बोलतात. आजच्या सभेत सरकारची जी काही उरली सुरली राहिली आहे, ती काढण्यासाठी म्हणून आजची सभा घेतोय”, असं राज ठाकरे म्हणाले. सरकारवरील टीकेनंतर त्यांनी आपला मोर्चा पवारांकडे वळविला. “पवारांनी मी नास्तिक म्हणालो, तर राष्ट्रवादीच्या अनेकांनी त्यांचे पूजा करतानाचे, देवाचं दर्शन घेतानाचे फोटो व्हायरल केले. पण अरे वेड्यांनो, त्यांची लेक सुप्रिया सुळे यांनी स्वत: संसदेत सांगितलं की पवारसाहेब नास्तिक आहेत. मग आता राष्ट्रवादीवाले पुढे काय बोलणार?” असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला.
“मी फक्त हीच सभा घेऊन थांबणार नाही. यानंतरच्या सभा मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यात होणार, विदर्भातही सभा घेणार, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात सभा घेणार, सभांना आडकाठी आणून काहीच होणार नाही. कुठेही बोललो तरी जनतेपर्यंत माझं भाषण जाणारच… कोंबडं झाकायचं ठरवलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही.”
“आमच्या घरामध्ये जातपात शिकवली नाही, आमचं घराणं जातपात मानत नाही. आम्हाला जातीपातीचं देणंघेणं नाही. मी जात बघून एखाद्याकडे जात नाही, जात बघून पुस्तक वाचत नाही. पण राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने जातीयवाद वाढला. जेम्स लेन प्रकरण पवारांनी तापविण्याचा प्रयत्न केला. जर त्याच्याविरोधात एवढाच जर रोष होता, तर केंद्रात तुमचं सरकार सत्तेत होतं, त्यावेळी त्याला खेचून का आणलं नाही?”, असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला.




