पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

नाशिक : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाअंतर्गत येणाऱ्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आणि लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या कामासंदर्भात राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आढावा घेतला.
यावेळी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, नितीन पवार, सरोज अहिरे, जिप अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, डॉ.राहुल आहेर व अधिकारी उपस्थित होते.

उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचे शाश्वत, परिणामकारक नियोजन तसेच जिल्ह्यातील छोट्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्याच्या अधिकाऱ्यांना पाटील यांनी सूचना केल्या.
पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पांच्या सर्वेक्षण व मान्यतांचा महिन्यातून एकदा आढावा मंत्रालय स्तरावर घेण्यात येतो. लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येत आहे.
गोदावरी खोऱ्यातील प्रकल्पांचे पाणी नाशिक, नगरसह जायकवाडीपर्यंत मुबलक तसेच सातत्यपूर्ण प्रवाहात राहण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. काही ठिकाणी पाणी वळविण्यासाठीच्या शक्यता तपासून त्याप्रमाणे आखणी करण्यात येईल. तसेच लहान प्रकल्प तात्काळ पूर्णत्वास नेले जातील.
नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील वगळण बंधाऱ्यांच्या व लिफ्टच्या कामात शासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून तातडीने ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दिंडोरी व कळवण मतदारसंघातील प्रकल्पांच्या कामासाठी लवकरच प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देण्याचा मनोदय पाटील यांनी व्यक्त केला आहे.



