लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी ८७.११ कोटी रुपयांचा धनादेश महापालिका आयुक्तांकडे सुपूर्द..

उपमुख्यमंत्री अजित पवार व समितीचे अध्यक्ष विजय डाकले यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द..
पुणे : आद्यक्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी आज महाराष्ट्र शासनाकडून ८७.११ कोटी रुपयांच्या तरतुदींचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार व स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले यांच्या हस्ते पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
आज सकाळी शासकिय विश्रामगृह पुणे येथे अजित पवार यांनी स्मारकाच्या कामकाजासंदर्भात बैठक बोलवली होती. याबैठकीत भूसंपादन, स्मारकाचा नियोजित आराखडा, त्याकरिता निधी यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी पवार यांनी आद्यक्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारकाच्या काम कशा प्रकारे केले जावे याबाबत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
यावेळी विभागीय आयुक्त सौरव राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, तसेच आद्यक्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले, सदस्य बाळासाहेब भांडे, रवी पाटोळे, रामभाऊ कसबे , डॉ. राजू अडागळे, शांतीलाल मिसाळ उपस्थित होते.
विजय डाकले यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्मारकाच्या कामाची प्रक्रिया वेगात सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्मारकाच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या ८७.११ कोटी रुपयांच्या तरतुदीचा धनादेश आज पुणे महापालिका आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. आता स्मारकासाठी भूसंपादनाचा महत्वाचा टप्पा पडणार असून पुढील काम ही जोरात सुरू होणार आहे. आद्यक्रांतिगुरू लहुजी साळवे यांचे एक दर्जेदार व आदर्शवत स्मारक उभे केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.










