कर्वेनगर मधील मुले घेत आहेत शिवकालीन शस्त्रनीती सिलंबम मर्दानी खेळाचे प्रशिक्षण…

विरेश शितोळे मित्र परिवाराच्या वतीने आयोजन
कर्वेनगर : विरेश शितोळे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्रनीती सिलंबम या मर्दानी खेळाचे मोफत प्रशिक्षण शिबीरात कर्वेनगर परिसरातील मुला मुलींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला असून ही मुले आता तलवारबाजी, लाठीकाठी, भाला व दान पट्टा चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. Children from Karvenagar are taking training in the Shiva-era Silambam masculine sport
शिवकालीन शस्त्रनीती सिलंबम या मर्दानी खेळाचे मोफत प्रशिक्षण शिबीरात कर्वेनगर भागातील मुले एक वेगळा अनुभव घेत आहेत. ७ मार्च २०२१ पर्यंत हे शिबिर श्रीराम सोसायटीच्या मैदानावर सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत चालणार आहे.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सुगंधा वर्तक, श्रीराम सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल पासलकर, संजयबाबू दोडके, कुस्ती क्षेत्रातील नामवंत पंच संदिप वांजळे, उद्योजक मनोज बराटे, अजित घोसाळे, श्रीराम सोसायटीचे सेक्रेटरी दिपक बागुल, संजीवनी उन्हाळे, प्रदिपजी चौधरी, भाऊसाहेब शितोळे, प्रशिक्षक कुंडलिक कचाले तसेच शिबिराचे आयोजक विरेश शितोळे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रशिक्षकांनी मर्दानी खेळांची करून दाखवलेली प्रात्यक्षिके पाहून उपस्थित नागरिक व पालकवर्ग भारावून गेला. या मर्दानी खेळांचे प्रशिक्षण घेताना सहभागी मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. आजच्या मुलांना शिवकालीन शस्त्रनीती सिलंबम या मर्दानी खेळाची माहिती व्हावी, त्यांनाही हे खेळ शिकता यावेत म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ३५० मुले या शिबिरात प्रशिक्षण घेत असल्याचे विरेश शितोळे यांनी सांगितले.






