Covid Vaccination : लस न घेतलेल्यांचे मृत्यूचे प्रमाण राज्यात अधिक

पुणे : कोविड प्रतिबंधात्मक लस (Covid Vaccination) न घेतल्याने राज्यात सर्वाधिक मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे. दरम्यान, लस घेतलेल्यांमध्ये संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. राज्य आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेदरम्यान आठ हजार 266 कोविड रुग्णांचा अभ्यास केला. त्यापैकी लसीकरण झालेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण केवळ 0.66 टक्के होते, तर लसीकरण न झालेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण तिप्पट म्हणजेच 2.1 टक्के होते.

लसवंतांमध्ये ब्रेक थ्रू संसर्गाचे प्रमाण अधिक असले, तरी लसीकरण न केलेल्या व्यक्तींपेक्षा संसर्गाची तीव्रता मात्र कमी होती. वेगवेगळ्या 36 जिल्ह्यांत केलेल्या सर्वेक्षणात आठ हजार 266 रुग्णांपैकी 943 रुग्णांचा एकच, चार हजार 359 जणांचे दोन्ही, तर उर्वरित दोन हजार 964 जणांचा एकही डोस झाला नव्हता. त्यापैकी एक डोस घेणाऱ्यांपैकी केवळ 35 रुग्णांचा (0.66 टक्के) मृत्यू झाला. दुसरीकडे लसीकरण न झालेल्या रुग्णांमध्ये मृत्युदर 2.1 टक्के होता. दरम्यान, लस घेतल्यानंतरही संसर्ग होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये अधिक असल्याचे कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले आहे.



