शांत बसतील ते अजित पवार कसले

मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका सर्वांनाच माहीत आहे. कोरोनाच्या काळातही त्यांचे अविरतपणे काम सुरू होते. थकवा व ताप आल्याने सामाजिक सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांनी स्वत:ला गृहविलगीकरण केले असले तरी ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित सुरु आहे. उपमुख्यमंत्री आवश्यकतेनुसार व्हीसी व दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.
गृहविलगी करणात असले तरी अजित पवार शांत बसलेले नाहीत. शासकीय स्तरावर निर्णय घेणे, अधिकाऱ्यांना सूचना देणे, पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतकार्याचा आढावा घेणे, फाईलींचा निपटारा करणे आदी कार्यालयीन कामे निवासस्थानावरुन नियमित व सुरळीत सुरु आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री हे ‘देवगिरी’ निवासस्थानाहून व्हीसीद्वारे सर्व बैठकांसाठी उपलब्ध असून त्यांच्या गृहविलगीकरण काळातही राज्य शासनाची निर्णयप्रक्रिया सुरु राहील, याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. असेही उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.



