कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकातील दुहेरी उड्डाणपुल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार : महापौर मुरलीधर मोहोळ

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली कामाची पाहणी..
पुणे : नळस्टॉप चौकातील अनेक वर्षाची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी व पुण्याच्या पश्चिम भागाची वाहतुक सुरळीत करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या नळ स्टॉप चौक येथील दुहेरी उड्डाणपुलाच्या कामाची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रो अधिकारी, नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन आढावा घेतला. या उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून हा उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी सुरु करण्यात येणार असल्याचे मोहोळ यांनी यावेळी सांगितले.
मोहोळ म्हणाले, स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे असताना पश्चिम पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी या दुहेरी उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यास निधी उपलब्ध करुन दिला होता. शिवाय या कामाला गती यावी यासाठी सातत्याने पाठपुरावाही सुरु होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. आता हे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच काम पूर्ण होऊन वाहतूक सुरु होऊ शकेल.
यावेळी महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. ब्रीजेश दीक्षित, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, स्थानिक नगरसेवक श्र दीपक पोटे, जयंत भावे, मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे
यांच्यासह महापालिका आणि मेट्रो अधिकारी उपस्थित होते.




