लक्ष्मीकृपा अर्बन को-ऑप बँकच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध ; अध्यक्षपदी नंदकुमार
गायकवाड यांची निवड

पुणे : पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात असलल्या लक्ष्मीकृपा अर्बन को – ऑप बँकेच्या अध्यक्षपदी नंदकुमार गायकवाड व उपाध्यक्षपदी ॲड. रामराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बँकेची संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया दि. २९.०२.२०२४ रोजी बिनविरोध पार पडली. बिनविरोध झालेल्या निवडणुकीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक स्नेहा जोशी यांनी काम पाहिले. बँकेच्या संचालक पदी अर्जुन एकनाथ सकुंडे, अर्चना वसंतराव देशमुख, मनिषा संजय गायकवाड, प्रताप शिवाजी निकम, आशिष हणमंतराव पाटील, महेंद्र पाटीलबुवा दांगट, दत्तात्रय भिकाजी पासलकर, विजय बबनराव शितोळे, प्रकाश रामचंद्र गिरमे, अशोक लक्ष्मण घिगे, डॉ चंद्रकांत मारुती डांबरे, तुषार गजानन केवटे, बापु बबन चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे.

बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नंदकुमार गायकवाड म्हणाले, कै. ॲड नामदेवराव निकम व कै. भास्करराव आव्हाड यांनी दि.०३.१०.१९९७ रोजी लावलेले रोपटे आज वटवृक्ष होत असताना माझ्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी आलेली आहे याचा मला अभिमान आहे. बँकेची स्थापना झाल्यापासून बिनविरोध निवडणूक घेणेची परंपरा याही वेळेस कायम राहिलेली आहे. यामध्ये सर्व सभासद, हितचिंतक यांचे मोलाचे योगदान आहे. सर्व संचालक हे विविध क्षेत्रातील अनुभव संपन्न आहेत त्यांची बँकेच्या प्रगतीत मोठी मदत होईल. रिझर्व्ह बँक व सहकार खाते यांच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे कामकाज करुन बँकेची प्रगती करावयाची आहे. सर्व खातेदार, ठेवीदार, सभासद, कर्जदार यांना बँकिंगच्या अद्यावत सेवा सुविधा देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत.





