प्रारूप मतदार यादीवर हरकतींची दखल !

पुणे : प्रारूप मतदारयादीवर नोंदविण्यात आलेल्या ४७ हजारांहून अधिक हरकतींची प्रशासनाने दखल घेतली आहे. प्रशासनाने या हरकतींची शहानिशा करून अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. यामुळे प्रारूप मतदारयादीत दाखविलेली ९२ हजार ४६६ मतदारांची नावे अंतिम मतदारयादीत योग्य प्रभागात गेली आहेत. महापालिकेचे निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी ही माहिती दिली.
पुणे महापालिकेने निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप मतदारयादीवर सुमारे ६५ हजार हरकती होत्या. यामध्ये कुटुंबातील एका व्यक्तीचे नाव एका प्रभागात, तर इतरांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याचे प्रकार होते. एका प्रभागातील नावे दुसऱ्या विधानसभा, लोकसभा मतदारसंघात गेल्याच्याही चुका होत्या. हरकती नोंदविण्याच्या मुदतीत मतदारांनी मोठ्या प्रमाणावर आक्षेप नोंदविले. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने हरकती नोंदविण्यासाठी मुदतवाढही दिली.

प्रारूप मतदारयादीवर ६५ हजारांपेक्षा अधिक हरकती आल्या. यापैकी २२ हजार ८०९ हरकती नागरिकांकडून, तर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर महापालिका प्रशासनाने ४५ हजार हरकतींची स्वत:हून दखल घेऊन त्या नोंदविल्या. या हरकतींपैकी १८ हजार १५० हरकती अमान्य करण्यात आल्या. हरकती नोंदविताना अनेकांनी बनावट कागदपत्रे दिल्याचे समोर आले. त्यांचा यात समावेश आहे.
महापालिकेचे निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितले की, महापालिकेच्या निवडणुकीसाठी २०११ ची जनगणना गृहीत धरण्यात आली असून त्यानुसार प्रभागरचना केली आहे. निवडणुकीसाठी एकूण मतदारांची संख्या ३५ लाख ५१ हजार ४६९ असून, दुबार मतदारांची नावे तीन लाख ४४६ आहेत. महापालिकेच्या ४१ पैकी १० प्रभागांमध्ये एक लाखापेक्षा जास्त मतदार आहेत. पुणे महापालिकेने तयार केलेल्या प्रभाग रचनेमध्ये ४० प्रभाग हे चार सदस्यांचे तर एक प्रभाग हा पाच सदस्यांचा असणार आहे.






