पालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

पुणे : पावसाळ्यात शहरात निर्माण होणाऱ्या जलमय परिस्थितीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळी पूर्वी नाले व पावसाळी लाईन साफसफाई वर करोडो रुपये खर्च केले जात असताना ही परिस्थिती निर्माण होतेच कशी असा प्रश्न उपस्थित करत आज शिवसेनेच्या वतीने महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजप पक्षाच्या विरोधात महापालिकेच्या आवारात आंदोलन करण्यात आले. यावेळी सत्ताधारी व पालिका प्रशासन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, शहरप्रमुख संजय मोरे, सहसंपर्क प्रमुख प्रशांत बधे, अजय भोसले, विजय देशमुख, शहर संघटिका सविता मते, संगीता ठोसर, विधसभाप्रमुख आनंद मंजाळकर, नगरसेवक बाळा ओसवाल, प्राची आल्हाट, गजानन थरकुडे, तानाजी लोणकर, नितीन वाघ, चंदन साळुंखे, आनंद गोयल, संजय वाल्हेकर, सूरज लोखंडे, जयदीप पडवळ व कार्यकर्ते उपस्थित होते.
थोडा जास्त जरी पाऊस झाला की पूर्ण शहर जलमय होत आहे. नागरिकांच्या घरांमध्ये, सोसायट्यांचे पार्किंग मध्ये पाणी शिरत आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात गाड्यांबरोबर माणसेही वाहून जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात वित्तहानी बरोबर जीवित हानी होत असताना प्रशासनाला व सत्ताधाऱ्यांना अजून जाग कशी येत नाही असा सवाल आंदोलनकर्त्यांकडून यावेळी उपस्थित करण्यात आला.
पावसाच्या पाण्यामुळे होणारे नुकसान हे निसर्गनिर्मित नसून पुणे महानगरपालिका निर्मित आहे कारण पावसाळ्यापूर्वी होणारी नाले सफाई, पावसाळी गटारांची सफाई योग्य पद्धतीने होत नसून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. पुणे शहरात करोड रुपये खर्च करून नालेसफाई व पावसाळी गटारांची सफाई करण्यात येते. तरी देखील पावसाळी पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदार व त्या खात्याअंतर्गत असणारे अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावसात पुणे शहराला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. वर्षभरात महानगरपालिका व सत्ताधारी भाजप यांना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीच उपाययोजना अमलात आणता आलेली नाही. पुणेकर नागरिक पुणे महानगरपालिकेला करोडो रुपयांचा कर भरत आहेत त्या पैशाचे योग्य नियोजन करून कोणताही भ्रष्टाचार न करता पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे व अशी वेळ पुन्हा पुन्हा पुणेकरांवर येऊ नये या प्रकारे उपाययोजना करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.



