कोथरूडमधील गवा अखेर जेरबंद ; अशी झाली पाच तासांची थरारक मोहीम..व्हिडिओ सह बातमी

पुणे: कोथरूडमधील महात्मा सोसायटीत आलेला गवा अखेर दुपारी साडेबारा वाजता तब्बल पाच तासांच्या प्रयत्नांनंतर जेरबंद करण्यात यश आले.वनखात्याच्या अधिकारी आणि महापालिका व अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी अथक प्रयत्नांनी या गव्याला पकडले. दरम्यान वनखात्याच्या ताब्यात असलेला गवा जखमी झाल्याने मृत्युमुखी पडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बुधवारी पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना अचानक गव्या चे दर्शन झाल्याने घबराट पसरली. महात्मा सोसायटीतील गल्ली क्रमांक एक मधील मोकळ्या जागेमध्ये या गवा दिसला. यापूर्वी पुण्यामध्ये गव्याचे वास्तव्य कुठे आढळून आले नाही त्यामुळे हा गवा कोल्हापूरहून पुण्यात आला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पौड रस्त्यावरील घराच्या कंपाऊंडमध्ये हा गवा शिरला होता. यावेळी वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला जेरबंद करीत गव्याला पकडण्यात वनखात्याला तब्बल पाच तासानंतर यश मिळविले आहे. पौड रस्त्यावरील महाराजा कॉम्प्लेक्स जवळील सिग्नल ला लागून असलेल्या एका घराच्या कंपाऊंडमध्ये गव्या ला पकडण्यात आले.
पुण्यात कोथरूडमध्ये महात्मा सोसायटीत आज (बुधवार) पहाटे पाच वाजल्यापासून एक मोठा गवा (Indian Gaur) आला होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर वनखात्याची टीम ट्रँक्विलायझर घेऊन तिथे पोहोचली. आणि या गव्याला जेरबंद केले.याबाबतीत माजी नगरसेवक राजेंद्र गोरडे म्हणाले, पहाटे साडेपाच वाजता फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना हा गवा दिसला. यानंतर मी वनखात्याकडे तक्रार केली.
असा घडला गवा पकडण्याचा थरार आणि नागरिकांनी घेतला मोकळा श्वास
स्थानिक नगरसेवक किरण दगडे म्हणाले, सकाळी माहिती मिळताच सर्व यंत्रणांना कळवले. महात्मा सोसायटीतील मोकळ्या जागेपासून सुरुवात झालेली मोहीम पौड रस्त्यावरील महाराजा कॉम्प्लेक्स जवळ येऊन थांबली. या पाच तासांच्या कालावधी मध्ये हा गवा मुख्य रस्त्यावरून नागरिकांच्या गर्दी मधून फिरत होता. मात्र सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. या घटनेमुळे नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक नगरसेविका अल्पना वर्पे म्हणाल्या, हा प्राणी मुख्य रस्त्यावरून महात्मा सोसायटी ते पौड रोड असा दीड किलमीटर चा गर्दी मधून फिरत होता. त्याला पकडण्यासाठी वनखाते, महापालिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक प्रयत्न करीत होते. पहिल्यांदा गवा पकडल्यानंतर तो निसटून पळाला मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याला पकडण्यात यश आले.



