राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी गिरीश गुरनानी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी गिरीश गुरनानी यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, शहराध्यक्ष श्रीकांत पाटील आणि विशाल तांबे यांच्या हस्ते गुरनानी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली.
गिरीश गुरनानी हे कोथरूडमधील आक्रमक आणि सक्रिय युवा नेतृत्व म्हणून परिचित आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोथरूड युवक अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी काम केले आहे.

युवक अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी विविध सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. विशेषतः भाजपच्या विरोधात केलेल्या विविध आंदोलनांमुळे गुरनानी कोथरूडच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आले होते. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची त्यांची कार्यपद्धती आणि आक्रमक शैली यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
आगामी काळात कोथरूड विधानसभा मतदारसंघात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, युवकांना पक्षाशी जोडणे तसेच स्थानिक प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठविण्याची जबाबदारी गुरनानी यांच्यावर राहणार आहे.
गुरनानी यांच्या नियुक्तीमुळे कोथरूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नवे आणि आक्रमक नेतृत्व मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.



