बंदी असतानाही नायलॉन मांजा विक्री कसा केला जातो : किरण बारटक्के यांची पोलिसांकडे कारवाईची मागणी

वारजेत मांजामुळे अपघात होता होता वाचला
वारजे : मागील आठवड्यात वारजे माळवाडी येथे मुख्य एनडीए रस्त्यावर चिनी मांजा आडवा आल्याने एका दुचाकी चालवणाऱ्या महिलेचा अपघात होता होता वाचला. सुदैवाने हा अपघात टाळला असला तरी शहरात अशा अपघातात चिनी मांजामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. चिनी मांजा विक्रीला बंदी असतानाही तो विकला जातो. त्यामुळे वारजे माळवाडी परिसरात असा मांजा विक्री करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी भाजप शहर सरचिटणीस, माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी केली आहे.

बारटक्के यांनी या संदर्भातील निवेदन वारजे पोलिसांना दिले असून चिनी व नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.



मागील आठवड्यात वारजे माळवाडी मुख्य रस्त्यावर
मोठया प्रमाणात वाहतूक सुरू असताना रस्त्याने जाणाऱ्या
एका महिलेच्या अंगाला पतंगाचा मांजा अडकला
मात्र एक जणाने जोरात आवाज देवून महिलेस थांबवले नसते तर मोठी अपघाती घटना घडली असती.



यावेळी सदर मांजा किरण बारटक्के व सामाजिक कार्यकर्ते अमर क्षीरसागर यांनी गोळा केला. तो नायलॉनचा मांजा असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. अशा नायलॉनच्या मांजामुळे शहरात घडलेल्या अपघातात अनेकांना प्राणाला मुकावे लागले आहे. काही महिन्यांपूर्वी असाच मांजा गळ्याला कापला गेल्याने कर्वेनगर मध्ये कॅनॉल रस्त्यावर एक युवक गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे बंदी असताना हा मांजा कसा विक्री केला जातो असा प्रश्न बारटक्के यांनी उपस्थित केला आहे. एखाद्याचा प्राण गेल्या नंतरच प्रशासनाला जाग येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एन डी ए रस्त्यावर गोळा केलेला मांजा वारजे पोलीस स्टेशन मध्ये जमा करून या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून कारवाई करण्याची मागणी बारटक्के यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.




















































































