“हालाखीच्या संघर्षातून उभी राहिली जिद्द; कंत्राटी महिला सफाई सेविका सुवर्णा पवार झाल्या १० वी पास”

आता थांबायचं नाय चित्रपटातून मिळाली प्रेरणा ; यशाबद्दल विशेष सन्मान
पुणे : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाची जिद्द कायम ठेवणाऱ्या, आणि आता थांबवायचं नाही चित्रपटातून प्रेरणा घेत रात्रशाळेत प्रवेश घेऊन १० वी च्या परीक्षेत ५५.२० टक्के गुण मिळवत यश संपादन करणाऱ्या कंत्राटी सफाई कर्मचारी सुवर्णा सोमनाथ पवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुणे महापालिकेच्या घोले रोड – शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक १२ अंतर्गत रोकडोबा मंदिर आरोग्य कोठी येथे त्या कंत्राटी महिला सफाई सेविका म्हणून कार्यरत आहेत. या यशाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
“आता थांबायचं नाय” हा प्रेरणादायी चित्रपट पाहिल्यानंतर शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द निर्माण झाल्याचे सुवर्णा पवार यांनी सांगितले. त्यांच्या या यशाबद्दल वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनिल कांबळे, पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे जॉइंट सेक्रेटरी वैजीनाथ गायकवाड, आरोग्य निरीक्षक राहुल शेळके आणि श्रीमती संगीता बदामी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, उदय सणस, निखिल निकम, राजेश रासकर, विनोद सरोदे, महेश जाधव, मोकादम राजू गायकवाड तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

सत्कार समारंभात भावना व्यक्त करताना सुवर्णा पवार म्हणाल्या, “सर्व अधिकारी, मोकादम आणि सहकारी सेवक यांच्या पाठिंब्यामुळेच मी रात्रपाळीच्या शाळेत प्रवेश घेऊन दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. या यशाचे सर्व श्रेय माझ्या सहकाऱ्यांना आणि मार्गदर्शन करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाते.”



सुवर्णा पवार यांचे बालपण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत गेले. त्यांचे माहेरचे नाव सुवर्णा लक्ष्मण अवघडे असून, मोलमजुरी करणारे आई-वडील विमल आणि लक्ष्मण अवघडे यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. माहेरी नववीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांचा विवाह मजूर कामगार सोमनाथ पवार यांच्याशी झाला. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. लग्नानंतरही परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. पतीचे १३ वर्षांपूर्वी अकाली निधन झाल्यानंतर संसाराची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. मुलीचे संगोपन आणि उदरनिर्वाहासाठी त्यांनी कचरा वेचणे, धुणीभांडी करणे, बांधकामावर मजुरी करणे, डोक्यावर वाळू-विटा वाहून नेणे अशी अनेक कष्टाची कामे केली.
त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात सार्वजनिक स्वच्छता विभागात कंत्राटी महिला सफाई कामगार म्हणून त्या काम करू लागल्या. कामगार युनियनच्या माध्यमातून त्यांचा “आता थांबायचं नाय” या चित्रपटाशी परिचय झाला आणि त्यातूनच शिक्षण पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. “मला शिकून वेगळं काहीतरी करायचं आहे. माझ्या मुलीला चांगलं शिक्षण द्यायचं आहे. तसेच इतर कामगारांनीही शिक्षण घ्यावं,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या



