बावधन बु.मध्ये लाखो रुपयांचा अवैध गावठी दारुसाठा जप्त ; दोघांना अटक, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई..

पुणे : निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डी विभाग, पुणे यांनी बावधन बुद्रुक मध्ये दोन ठिकाणी छापा मारत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. Illegal village liquor worth lakhs of rupees seized in Bawadhan Budruk; Both arrested, action taken by state excise department.
राज्य उत्पादन शुल्क, डी विभाग, पुणे यांना गुप्त बातमीदारा मार्फत आषाढ (गटारी) अमावस्याच्या पार्श्वभूमीवर बावधन बुद्रुक मध्ये अवैध गावठी दारूचा साठा मोठ्या प्रमाणावर करुन ठेवला असल्याबाबत माहिती मिळाली होती.
त्यावरून बावधन बुद्रुक मधील स.नं. ३४/३, क्षत्रियनगर, त्रिशा बंगल्यामध्ये ३५ लिटर क्षमतेचे ३० प्लॅस्टिक कॅन तसेच सदर बंगल्याच्या पार्किंगमधील युंदाई कंपनीची सॅन्ट्रो कार क्र. MH१४ X ४७४४ या चारचाकी वाहनात ३५ लिटर क्षमतेचे १० प्लॅस्टिक कॅन अवैध गावठी दारूसह मिळून आल्याने एकुण रु. १,१८,५००/-किंमतीचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आला. या प्रकरणात विवेक मुकुटसिंग रजपूत, वय-४१ वर्षे, रा. बावधन बु. यास अटक करण्यात आली आहे.
याच भागातील भुंडे वस्ती येथील बिंदीया अनिल रजपूत यांच्या राहत्या घरात छापा मारला असता ३५ लिटर क्षमतेचे १५ प्लॅस्टिक कॅन तसेच पार्किंगमधील मारुती सुझुकी कंपनीची अल्टो कार क्र. MH१२LJ १२७९ या चारचाकी वाहनात ३५ लिटर क्षमतेचे ५ प्लॅस्टिक कॅन अवैध गावठी दारूसह मिळून आल्याने एकुण रु. १,२२,७५०/-किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बिंदीया अनिल रजपूत, वय-४६ वर्षे, रा. बावधन बु. पुणे हिस अटक करुन मुबंई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ क, ड अन्वये गुन्हे नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास विभागाचे तपासअधिकारी करत आहेत.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उप-आयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे, उप-अधीक्षक संजय आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी विभागाचे निरीक्षक संजय डेरे, निरीक्षक राजाराम शेवाळे, उप-निरीक्षक- तानाजी शिंदे, गणेश केंद्रे यांनी केली. सदर कारवाईत सह.दु.नि. रोहिदास मासाळकर, जवान सर्वश्री समीर पडवळ, दत्तात्रय पिलावरे, शरद भोर, वाहनचालक दत्तात्रय आबनावे, महिला जवान निलम पिंगळे, शाईन इनामदार, शामल धुमक यांनी सहभाग घेतला.

कर्वेनगर मधील उद्यानात धक्कादायक प्रकार



