पुणे शहर

साहित्य संमेलनात बालकुमार साहित्याविषयी व्हावे विचारमंथन
भारत सासणे यांची अपेक्षा

अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी बालसाहित्य पुरस्कारांचे वितरण

पुणे : उत्तम बालसाहित्य निर्माण झाल्याचा इतिहास आहे. मध्यंतरीच्या काळात अनुवादरूपाने इंग्रजी बालसाहित्य मराठीत आले, इंग्रजीचा प्रभाव त्या काळी टाळता येणे शक्य नव्हते. मंत्रयुगातून आज आपण तंत्रयुगात आलो असल्याने अनेक प्रकारची माहिती सहजतेने उपलब्ध होत आहे. त्यामुळे उत्तमोत्तम बालकुमार साहित्य निर्माण व्हावे. साहित्य संमेलन या सर्वोच्च स्थानी बालकुमार साहित्याचे मंथन झाले तर त्याचा लेखकांना निश्चित फायदा होईल, असे प्रतिपादन उदगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांनी केले. बालकांसाठी नव्हे तर बालकुमार साहित्य निर्मिती करणार्‍या लेखकांसाठी कार्यशाळा, चर्चासत्रे, परिसंवाद घडवून आणावेत अशी सूचनाही त्यांनी केली.


अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेतर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी बालसाहित्य पुरस्करांचे वितरण आज महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती (हिंदी भवन) येथे सासणे यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे, उपाध्यक्ष माधव राजगुरू, कार्यावाह मुकुंद तेलीचरी, सहकार्यवाह सुनील महाजन, विश्वस्त ज. गं. फगरे, कोषाध्यक्ष डॉ. दिलीप गरूड, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.
डॉ. सुनील विभुते, प्रभाकर शेळके, मुग्धा घेवरीकर, पियुष गांगुर्डे, नागेश शेवाळकर, प्रा. नीलिमा गुंडी, वीरा राठोड आणि प्रा. सुहास बारटक्के यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

सासणे म्हणाले, बालसाहित्य म्हणजे काय याची व्याख्या वेगवेगळी असू शकते. त्या विषयी चर्चा होणे गरजेचे आहे. बालसाहित्यिक कथाकार यांच्या बरोबर चर्चा व्हावी, विचारमंथन व्हावे ज्यात बालसाहित्य लेखकांनी काय लिहिवे, काय लिहू नये याचे मार्गदर्शन केले जावे. बालसाहित्यात महत्त्व कशाला द्यायचे हे लेखकाने शोधायचे असते. बालसाहित्यात बुद्धीरंजन-मनोरंजन-संस्कार यांचा समतोल-समन्वय साधणे गरजेचे आहे, या मुद्द्याकडे सासणे यांनी लक्ष वेधले. चित्ररूप कथामालेतील बालसाहित्य कसे वाचावे, समजून घ्यावे याचे ग्रामीण भागातील मुलांना ज्ञान द्यावे, कारण चित्ररूपी कथामाला हे बालसाहित्य नि:शब्द असते त्यात गोष्ट चित्रारूपाने पुढे जाते. या विषयी मराठी बालसाहित्य प्रकारात काम झालेले नाही, ते आजच्या काळातील बालसाहित्य निर्मिती करणार्‍या लेखकांनी करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना प्रा. नीलिमा गुंडी म्हणाल्या, मुलांना भाषा कशी शिकवावी याची सर्जनशील-कल्पक पद्धत अवलंबली पाहिजे. भाषा शिकण्याविषयी मुलांची उत्सुकता शिक्षकांनी वाढविली पाहिजे, शब्दांची-भाषेची गंमत याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले पाहिजे. मुलांचे कुतुहल जागृत ठेवून भाषेची श्रीमंती दाखविणे हे शिक्षकाला साधता आले पाहिजे. भाषा सूक्ष्म-तरल अशी गोष्ट आहे. बोलता-लिहिता आले म्हणजे भाषा शिकली असे नाही. भाषेच्या उच्चारणासाठी बालकांसाठी तसेच मोठ्यांसाठी कोश निर्माण व्हावा, अशी अपेक्षा प्रा. गुंडी यांनी व्यक्त केली.
आज समाजात चांगल्याला चांगले म्हणण्याची सवय गेली असल्याचे मत फगरे यांनी व्यक्त केले. त्यांनी भविष्यातील वाटचालीसाठी सासणे यांना शुभेच्छा दिल्या.

Img 20211231 wa00066164473394770712000


सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. संगीता बर्वे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. सुनील महाजन यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली. सासणे यांचा परिचय मुकुंद तेलीचरी यांनी करून दिला. सासणे यांचा सत्कार पुणेरी पगडी, शाल, ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. मीना सासणे यांचा सत्कार डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते करण्यात आला. मुग्धा घेवरीकर, डॉ. सुनील विभुते, प्रा. सुहास बारटक्के, वीरा राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. परिक्षकांच्या वतीने कविता मेहेंदळे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार निर्मला सारडा यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. दिलीप गरूड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये