आनंदाची बातमी : पुणे मेट्रोची वनाज ते गरवारे महाविद्यालय ट्रायल रन १५ ऑगस्टपूर्वीच !

पुणे : लॉकडाऊननंतर मेट्रोच्या कामाला उत्तम वेग आला असून कोथरूड परिसरातील वनाज ते गरवारे महाविद्यालयदरम्यान ट्रायल रन होणार आहे. या कामाची महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत पाहणी करताना महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली आहे.
अवघ्या सहा महिन्यांत साकारला जाणार नळस्टॉप येथील दुहेरी उड्डाणपूल !
पुण्याच्या पश्चिम भागाच्या सुरळीत वाहतुकीसाठी वरदान ठरणाऱ्या नळ स्टॉप येथील दुहेरी उड्डाणपुलाच्या कामाची मेट्रो अधिकारी, नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन आढावा घेतला. यावेळी या भागातील ड्रेनेज लाईन आणि पाणीपुरवठा वाहिन्या याचाही आढावा घेतला. येत्या ६ महिन्यात दुहेरी उड्डाणपूल सुरु करण्याचे नियोजन असून यासंदर्भातील सूचना महापौर मोहोळ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

मोहोळ म्हणाले, स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्याकडे असताना आपण या दुहेरी उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यास निधी उपलब्ध करुन दिला होता. शिवाय या कामाला गती यावी यासाठी सातत्याने पाठपुरावाही सुरु होता. या भागातील वाहतुकीचे नियोजन उत्तमरीत्या व्हावे, यासाठी यावेळी वाहतूक पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. लॉ कॉलेज रस्ता, एसएनडीटी चौक आणि नळस्टॉप या भागातील वाहतुकीचा प्रश्न लवकरच सोडवला जात आहे.
महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रमण्यम, अतुल गाडगीळ, श्री. गौतम बिऱ्हाडे, महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, स्थानिक नगरसेवक श्री. दीपक पोटे, श्री. जयंत भावे, माधुरीताई सहस्रबुद्धे, मंजुश्रीताई खर्डेकर, वासंती जाधव, हर्षाली माथवड आदी यावेळी उपस्थित होते.



