कंगना रनौत अखेर खार पोलीस ठाण्यात हजर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं शेतकरी आंदोलनाच्या वेळी शीख समुदायाबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केले होते. या प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी अभिनेत्री कंगना रणौत मुंबईच्या खार पोलीस ठाण्यात पोहोचली आहे. पोलिसांनी कलम २९५ अ अंतर्गत कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
कंगनाने सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून ट्वीट करताना शीख समुदायाला उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरले होते. या ट्वीटनंतर कंगनावर टीका झाली होती. मुंबई पोलिसांनी याआधी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं होतं की, पोलीस 25 जानेवारी 2022 पर्यंत कंगनाला तिच्या समाज माध्यम पोस्टसाठी अटक करणार नाहीत. उच्च न्यायालयाने कंगनाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मांडल्यानंतर मुंबई पोलिसांनी हे स्टेटमेंट दिले होते.
कंगनाने डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला उच्च न्यायालयात धाव घेत खार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली तक्रार रद्द करण्याची विनंती केली होती.







