‘देवगड हापूस’ म्हणून केरळच्या आंब्याची होतेय विक्री

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डात केरळ आंब्याची ‘देवगड हापूस’ या नावाने विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने फळ बाजारातील तीन अडत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून 7 हजार 80 रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये 1 डझनचे 42 बॉक्स बाजार समितीने जप्त केले आहेत.
बाजारात कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्याची देवगड, रत्नागिरी येथून आवक होते. त्याशिवाय कर्नाटकातूनही आंबा येतो. मात्र, दोघांच्या चव आणि सालीमध्ये फरक आहे. कोकणातील हापूस आंबा रसाळ आणि चवीस चांगला असतो. त्यामुळे कोकणातील आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. म्हणूनच या आंब्याच्या किंमतीही जास्त असतात. याचा फायदा घेत व्यापारी, विक्रेते नागरिकांची फसवणूक करतात. हंगामाच्या सुरवातीला असा प्रकार उघडकीस आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेच्या बाजार आवारात 3 व्यापाऱ्यांनी केरळ आंबा हा देवगड आंबा या नावाने लेबल विक्री केल्याचे आढळल्याने हा केरळ आंबा बाजार समितीने जप्त केला आहे.




