आरोग्य

चला तर मग हृदय निरोगी ठेवू
डॉ.सचिन नागापूरकर

हे हृदय खूप छान आहे. शरीरातील सगळे अवयव महत्वाचे आहेतच पण हे हृदय, दिल,धडकण, काळीज अत्यंत महत्वाचे आहे. कारण ह्यातून तयार होणारी कंपणे प्रेम, जिव्हाळा निर्माण करतात. त्यामुळे ते सदैव निरोगी असणे आवश्यक आहे. हृदय आपल्यासाठी जन्म झाल्यापासून सतत चोवीस तास काम करत असते. चला तर मग ते निरोगी राहीले त्यासाठी आपण किमान अर्धा तास व्यायाम करून त्याला सतत सदैव निरोगी ठेऊयात.

१९९९ सालापासून दरवर्षी जागतिक स्तरावर २९ सप्टेंबर हा दिवस जागतिक आरोग्य संघटने मार्फत जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. आज जगभरात हृदय विकाराने आजारी असणाऱ्या व हृदय विकाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जगातील एकून मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येमध्ये सर्वात जास्त आहे. तरूण वयात  हृदय विकाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या पण सर्वात जास्त आहे. त्यामुळे खरच चिंता, काळजी घेणे आवश्यक आहे ती म्हणजे आपल्या हृदयाची.

जे हृदय आपल्याला चोवीस तास जिवंत ठेवते. आपल्या साठी सतत अहोरात्र काम करत असते ते निरोगी कसे राहील त्यासाठी आपण नक्कीच योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

हृदय म्हणा..मन..म्हणा….
काळीज म्हणा….ते जपले पाहिजे…
हृदय विकाराने आजारी असणाऱ्या रूग्णांचा विचार केला. तर हृदय विकाराने आजारी असण्याचे मुख्य कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. संत तुकाराम महाराज यांनी किती तरी वर्षा पुर्वी लिहून ठेवले आहे ते म्हणजे…
“मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण”

हृदय रोगाची अजून बरीच वैद्यकीय कारणे आहेतच पण मन..चित्त..काळीज शांत नसणे, त्यावर असणारा मानसिक ताणतणाव, एकमेकांबद्दल असणारा तिरस्कार, हेवेदावे, कमी होत जाणारे सामाजिक पारिवारीक संबंध, दुरावा, समोरच्या व्यक्तीला समजून न घेण्याची वृत्ती, ऑफिस, घरातील काम, व्यवसायात येणारे टेंशन व मानसिक ताणतणाव व त्यामुळे वाढत जाणारे रक्ताचा दाब व होणारा हृदय विकार.

वैद्यकीय कारणांचा विचार करावयाचा झाला तर ,
काही रूग्णांना जन्मतः असणारे हृदयाचे आजार , सतत वाढत जाणारे वजन, व्यायामाची कमतरता, असणारी व्यसने, विशेषत: धुम्रपान, दारू, बैठे काम व त्यामुळे न होणारी शरिराची हालचाल, वेळी अवेळी जेवण, वैद्यकीय आजार जसे की मधूमेह, उच्च रक्तदाब, चरबीचे जास्त असणारे प्रमाण. ही अशी काही कारणे आहेत ज्यामुळे हृदय विकारचे आजार वाढत आहेत.

आज जागतिक हृदय दिनी आपण आपल्या हृदयाचे आरोग्य कसे निरोगी राहील ह्यासाठी प्रयत्न करूयात.
मन जे सर्व रोगांचे केंद्र आहे ते कसे शांत राहील त्यासाठी प्रयत्न करूयात. रागावर नियंत्रण ठेवणे, हेवेदावे कमी करणे, कोणाचाही तिरस्कार न करणे, जे आपले आहे ते आपलेच आहे हे लक्षात ठेवणे, दुसऱ्याला किती जास्त मिळाले ह्यासाठी आपण चिडचिड त्रास करून न घेणे, आपले शरीर कसे निरोगी राहीले त्यासाठी सकस आहार घेणे,  योग्य तो व्यायाम, चालणे, सायकल चालवणे, धावणे, पोहणे, मैदानावरील खेळ खेळणे ,  व्यसने बंद अथवा कमी करणे, आहारावर योग्य ते नियंत्रण ठेवणे,
वैद्यकीय आजार असतील तर त्यासाठी लवकरात लवकर उपचार करणे, कोणताही आजार अंगावर न काढता वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार सुरू करणे, असे उपाय करणे गरजेचे आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये