कोथरूडमध्ये रंगणार आमदार नाटय महोत्सव; प्रशांत दामले यांच्या विशेष सत्काराचे आयोजन

14 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत नाटय रसिकांना मेजवानी
कोथरुड : आमदार महोत्सव अंतर्गत घेण्यात येत असलेल्या कोथरूड नाट्यमहोत्सव 2022 मध्ये कोथरूडकरांना दर्जेदार नाटकांची मेजवानी मिळणार आहे. भाजपचे अजित जगताप व सुजाता अजित जगताप यांच्या वतीने या नाट्यमहोत्सवाचे यशवंतराव चव्हाण नाटयगृहामध्ये आयोजन करण्यात आले आहे.
कोविड संपल्यानंतर नाट्यगृहे खुली झाल्यानंतर महाराष्ट्रात पहिला नाट्य महोत्सव हा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून आणि अजित जगताप यांच्या संकल्पनेतून साकारला गेला. यंदा या नाटय महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे.नाट्य महोत्सवाची माहिती देताना अजित जगताप यांनी सांगितले की, दिनांक सोमवार १४ ते बुधवार १६ नोव्हेंबर या कालावधीत हा नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १४ नोव्हेंबरला बाल दिनानिमित्त महापालिका शाळेतील बालगोपालांसाठी अलबत्या गलबत्या या बाल नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी कोथरूड मधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महोत्सवास प्रारंभ करण्यात येणार आहे. यामध्ये रोलबॉल मध्ये 19 वर्षाखालील महाराष्ट्राची कर्णधार मेहेक सुनिल राऊत,चक्रासन अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 101 गडकिल्ल्यांची नावे 44.86 सेकंदात सांगून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये विक्रम करणारी कादंबरी मोहोळ, शिव छत्रपती पुरस्कार विजेती साक्षी माथवड, अबॅकस आणि कथक नृत्यात विशेष प्रावीण्य मिळविलेल्या देवकी टिळक राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक विजेती आदिती डोंगरे यांचा समावेश आहे. तर १५ नोव्हेंबरला हीच तर फॅमिलीची गंमत आहे या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणेकरांच्या वतीने प्रशांत दामले यांचा विशेष सत्कार
१६ नोव्हेंबर एका लग्नाची पुढची गोष्ट या अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी १२ हजार ५०० नाट्य प्रयोग झाल्याबद्दल प्रशांत दामले यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणेकरांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी १२ हजार ५०० बदामांचा हार त्यांना घालण्यात येणार असून दामले यांना त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासात साथ देणाऱ्या बॅक स्टेज कलाकारांचाही विशेष सन्मान यावेळी केला जाणार आहे.
याबाबत अजित जगताप यांनी सांगितले की, या आमदार नाट्यमहोत्सवातून कोथरुडकर रसिक श्रोत्यांचे निखळ मनोरंजन होणार आहे. हे महोत्सवाचे दुसरे वर्ष असून मागील वर्षी कोरोना नंतर नाटयगृह सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात पहिला नाटय महोत्सव म्हणून आमच्या महोत्सवाची नोंद झाली आहे.





