ओबीसींसाठी कॉंग्रेस कटीबद्ध, फुले पगडी हा महाराष्ट्राचा सन्मान : राहुल गांधी

नांदेड : महात्मा फुले यांची पगडी हा महाराष्ट्राचा सन्मान आहे. हा विचार मी डोक्यात ठेवून काम करेल. या विचारांना मी झुकू देणार नाही. फुले शाहू आंबेडकर यांचे विचारच देशाला वाचवतील, असे मत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. काॅंग्रेसचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी नांदेड येथे महात्मा फुले यांची पगडी घालून राहुल गांधी यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी हे विचार मांडले. ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी कॉंग्रेस कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.




भारत जोडो यात्रेदरम्यान अर्धापूर, नांदेड या ठिकाणी ओबीसी पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. महात्मा फुले यांचे विचार घेऊन काॅंग्रेस पक्ष सदैव काम करेल, असे राहुल गांधी यांनी सांगितले. भानुदास माळी यांनी ओबीसींच्या दोन प्रमुख मागण्यांवरती राहुल गांधी यांचे लक्ष वेधले. यामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना व कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन या दोन प्रमुख प्रश्नांवरती काँग्रेस पक्षाने ठाम भूमिका घ्यावी, असे विचार मांडले. राहुल गांधी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात या दोन प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात येईल, असे आश्वासन दिले. लोकसभा निवडणूकीपूर्वी पुणे येथे ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून या मेळाव्यास राहुल गांधी यांनी उपस्थित राहण्याची विनंती मान्य केली आहे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना व ओबीसींच्या आरक्षणाला घटनात्मक संरक्षण देण्यासाठी काॅंग्रेस कटीबद्ध आहे असे राहुल गांधी यांनी सांगितले.





