पुणे वाहतुकीसाठी सुलभ आणि सुरक्षित व्हावे यासाठी महानगरपालिका आणि पोलीस यांची एकत्रित बैठक घेणार – खासदार मेधा कुलकर्णी

खासदार मेधा कुलकर्णी यांची घटनास्थळी अधिकाऱ्यांसमवेत चर्चा
पुणे: खासदार मेधा कुलकर्णी यांनी काल चांदणी चौकात झालेल्या अपघाताच्या ठिकाणी तातडीने अपघात स्थळी जाऊन भेट दिली. पोलीस अधिकारी, एसटी महामंडळाचे अधिकारी, नागरिक यांच्याशी चर्चा केली.पुणे वाहतुकीसाठी सुलभ आणि सुरक्षित व्हावे यासाठी महानगरपालिका आणि पोलीस खातं यांची संयुक्त बैठक घेऊन उपययोजना करण्यासाठीं प्रयत्न करणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
काल झालेल्या अपघाताच्या घटने मध्ये चांदणी चौकातून कोथरूडकडे येणाऱ्या उतारावर एक मालवाहतूक एसटी महाकार्गो ही मिक्सरला धडकली आणि त्याच्यानंतर तिने दुचाकीला उडवले आणि तीन जण गंभीर झाले.
खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, पुण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. रोज दोन तीन ठिकाणी अतिशय गंभीर असे अपघात होतात. या संदर्भामध्ये मी देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहिलं आहे आणि १४ तारखेला मुंबईला ते देवेंद्रजींना देणार आहे. महानगरपालिका आणि पोलीस खातं यांची एक संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी काहीतरी इलाज करायला पाहिजे आणि हा प्रत्येक प्रत्येक ठिकाणी उपाययोजना करायला हव्यात. चौकाच्या रचनेतील दोष सुधारणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, रस्ते वाहतुकीसाठी अतिक्रमण मुक्त करणे, वाहनांना जड वाहनांना बंदी च्या नियमाचे काटेकोर पालन, वाहतुकीचे नियमांचे पालन आणि त्यावर पोलिसांचे नियंत्रण या सगळ्या गोष्टींची मागणी मी केली आहे.
आगामी काळात महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांची एकत्रित बैठक घेऊन पुणे वाहतुकीसाठी सुलभ आणि सुरक्षित व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे. असे कुलकर्णी म्हणाल्या.

























