पुणे महापालिका निवडणुक : अपेक्षित आरक्षणासाठी इच्छुकांचे देवाला साकडे; उद्या होणार आरक्षण निश्चित
निवडणूक चित्र स्पष्ट होणार

पुणे : पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसुचित जमाती महिला आणि सर्वसाधारण गट महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढणे तसेच प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासंबंधीत कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
उद्या 31 मे रोजी सकाळी 11 वाजता गणेश कला क्रीडा मंच, नेहरू स्टेडियम जवळ स्वारगेट येथे आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीने याची संपुर्ण तयारी करण्यात आली आहे. त्यामूळे पुणे महापालिका निवडणुकीत कोणत्या प्रभागात किती पुरुष आणि किती महिला उमेदवार असणार हे स्पष्ट होणार आहे.
दोन पुरुष की दोन महिला चित्र होणार स्पष्ट
उद्या होणाऱ्या आरक्षण निश्चिती नंतर इच्छूक उमेदवारांना निवडणूकीसाठी रणनीती निश्चित करता येणार आहे. तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे अनेक प्रभागात दोन महिला एक पुरुष अशी विभागणी होणार आहे. त्यामुळे आपल्या प्रभागात दोन पुरुष आणि एक महिला असे आरक्षण व्हावे. यासाठी इच्छूक उमेदवार देवाकडे प्रार्थना करीत आहेत.
अनेक प्रभागात होणार काटे की टक्कर
ज्या प्रभागांमध्ये एक महिला आणि दोन पुरुष अशी आरक्षणाची विभागणी होईल. एका प्रभागातील विरोधातील दिग्गज उमेदवार मोक्याच्या क्षणी एकमेकांच्या समोर न येता दुसऱ्या गटात जाऊन निवडणूक लढवितात कारण दोन पुरुष गटाचा फायदा घेता येतो. मात्र एक महिला आणि दोन पुरुष असे गट झाल्यास विरोधातील दोन्ही तगड्या उमेदवारांना या प्रभागात समोरासमोर उभे राहावे लागणार असल्याने अनेक प्रभागात काटे कि टक्कर पाहायला मिळणार आहे.




