महाराष्ट्र

सोशल मीडिया, व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल

मुंबई : सोशल मीडियाचा दुरुपयोग करून आक्षेपार्ह, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास आता पोलिसांनी सुरुवात केली आहे. एकट्या नंदुरबार जिल्ह्यात असे नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप, व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता पोलीस बारकाईने लक्ष ठेवत आहेत. अनेक जण सोशल मीडियाच्या आहारी जात असून त्याचा दुरुपयोग करत असल्याचे समोर येत आहे.

अक्कलकुवा, शहादा, नवापूर आणि नंदुरबार येथे सोशल मीडियाचा दुरुपयोग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये अनेक लोकांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. अनेक लोक एखादी पोस्ट व्हायरल किंवा स्टेटस ठेवण्याआधी शहानिशा करत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात येते आहे. असं कृत्य करताना जो कुणी आढळेल, त्यावर कडक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा नंदुरबारचे जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिला आहे.

पी. आर. पाटील म्हणाले, “सोशल मीडियावर काही ठिकाणी धार्मिक विषयांवर चुकीच्या पध्दतीचे स्टेट्स आणि पोस्ट करण्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ९ गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणांमधील ९ आरोपींना तातडीने अटकही करण्यात आली आहे. असं असतानाही काही लोक धार्मिक तेढ वाढवणारे स्टेटस ठेवत आहेत किंवा सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करत आहेत. त्यामुळे पोलिसांना कारवाई करावी लागत आहे. अशा तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करताना किंवा स्टेटस ठेवताना कुणी आढळलं तर अशा आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. गेल्या काही दिवसात अशा पोस्ट करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेऊन आहोत. आमचा सायबर सेल यावर काम करत आहे. सोशल मीडियावर व्यक्त होत असताना नागरिकांनी अतिशय संयमाने व्यक्त व्हावं,”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये