महाराष्ट्र

राष्ट्रवादी चे आमदार भारत भालके यांचे निधन


पुणे : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले आहे. गेले काही दिवस पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे.

मागील महिन्यात करोनाची लागण झाल्यानंतर बरे होऊन ते घरी गेले होते. परंतु पुन्हा तब्येत बिघडल्याने ते रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. शुक्रवारी त्यांची प्रकृती खालवल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.  त्यांची तब्येत चिंताजनक झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करून डॉक्टरांशी चर्चा केली होती.  राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली होती.

भालके यांची तब्येत चिंताजनक झाल्याने कळाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तसेच कार्यकर्त्यांकडून त्यांची तब्येत सुधारावी यासाठी विठ्ठलाकडे प्रार्थना करण्यात येत होती. परंतु भालके यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

भालके यांना पाहण्यासाठी पंढरपुरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची रुग्णालयाबाहेर  झुंबड उडाली होती मात्र निधनाचे वृत्त कळताच कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पंढरपूरच्या सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये