राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सेलकडून अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

राज्यभर अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबविण्याचा निर्धार
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची बैठक संपन्न…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेलकडुन शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन कार्यालयात शोकसभा पार पडली. या शोकसभेत राज्यभर अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबविण्याबाबत एकमताने निर्धार करण्यात आला आहे.

“समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हे अजितदादा पवार यांचे ध्येय पुढे नेण्यासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशी राज्यात सहा विभागांची आखणी करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. पुढील काळात उपमुख्यमंत्री तसेच पक्षाच्या नेत्या सुनित्राताई पवार,प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला मजबूती देण्याचा विश्वास यावेळी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेल शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या या शोकसभा बैठकीत सामाजिक न्यायाशी संबंधित विविध प्रश्न, आगामी पक्ष संघटनात्मक कार्यक्रम तसेच वंचित, दुर्बल घटकांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. अजितदादा पवार यांच्या शाहू, फुले, आंबेडकर विचारधारेवर पुढील वाटचाल सुरू ठेवण्यासाठी एकजूट ठेवत सामाजिक न्याय विभागाची भूमिका अधिक सक्रिय व जनतेशी जोडलेली असावी, अशी सुचना अण्णा बनसोडे यांनी दिली.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशी राज्यात सहा विभागांची आखणी करत पक्ष बांधणी करण्यात येणार आहे. बैठकी दरम्यान शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील समस्या, उपक्रम व संघटनात्मक कामाचा आढावा सादर करत सूचना व्यक्त केल्या. सामाजिक न्याय विषयक शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी पक्ष पातळीवर समन्वय वाढवण्यावर भर देण्यात येईल असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब करडक, शहर तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आगामी काळात जिल्हा व तालुकास्तरावर बैठका, जनजागृती अभियान व सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.



