ज्यांनी पाया घातला, नावही त्यांचेच हवे ! वारजेतील कल्चरल सेंटरला स्व.अजित दादा पवार यांचे नाव देण्याची मागणी..

माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी घेतली आयुक्तांची भेट..
पुणे : वारजे माळवाडी मध्ये माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या प्रयत्नातून महापालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या कल्चरल सेंटरचे अजित दादांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. या प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून त्याला स्व.मा. ना. अजितदादा पवार सांस्कृतिक भवन” असे नाव देण्यात यावे अशी मागणी दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व धडाडीचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी, विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान, विकासाभिमुख व सर्वसामान्यांचा आधार असलेला नेता गमावला आहे. कार्यकर्त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात दादांच्या आठवणी घर करून आहेत.
कार्यकर्त्यांच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहत त्यांचा खंबीर आधार बनण्याचे काम दादांनी केले होते. पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पुणे शहरात उभ्या करण्यात आलेल्या अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटने अजित दादांच्या हस्ते झाली होती. दादांनी भूमिपूजन केलेले अनेक प्रकल्प आज पूर्णत्वाकडे जात आहेत. त्यामुळे अशा प्रकल्पाच्या बाबतीत दादांच्या आठवणी जोडल्या गेल्या असल्याने त्याला दादांचे नाव दिले जावे अशी भूमिका कार्यकर्ते, पदाधिकारी घेताना दिसत आहेत.

असाच एक प्रकल्प वारजेत पूर्णत्वास जात आहे. पुणे महानगरपालिका भवन खात्याच्या अंतर्गत व माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदिप धुमाळ यांच्या प्रयत्नातून वारजे येथील सर्वे नं ११९ मध्ये कल्चरल सेंटर अंतर्गत कौशल्य विकास केंद्र या प्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले होते. या प्रकप्लाचे काम ८० % पूर्ण झाले असून त्याला “स्व.मा. ना. अजितदादा पवार सांस्कृतिक भवन” असे नाव देण्यात यावे अशी मागणी बाबा धुमाळ यांनी केली असून त्याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिले आहे. यावेळी माजी महापौर दत्ता धनकुडे, ह.भ.प. धर्मराज महाराज हांडे उपस्थित होते.



बाबा धुमाळ म्हणाले, दादा कायम कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहिले. आमच्या प्रयत्नातून महापालिकेच्या माध्यमातून वारजेत झालेल्या अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटने दादांच्या हस्ते झाली होती. त्यामुळे दादांच्या आठवणी या प्रकल्पांच्या माध्यमातून वारजेकरांबरोबर राहणार आहेत. दादांनीच भूमिपूजन केलेल्या प्रकल्पाला त्यांचे नाव द्यावे लागेल अशी वेळ येईल असे कधी वाटले नव्हते, पण हा प्रसंग मन हेलावून टाकणारा आहे. दादा नसले तरी त्यांच्या आठवणी कायम बरोबर राहणार आहेत. त्यामुळे वारजेत होत असलेल्या कल्चरल सेंटरला “स्व.मा. ना. अजितदादा पवार सांस्कृतिक भवन” असे नाव देण्यात यावे अशी मागणी आम्ही महापालिका आयुक्तांकडे केली आहे.






