पत्रकार तुषार खरात यांच्या न्यायासाठी आज दहिवडी येथे “संविधान वाचन आंदोलन”

दहिवडी (प्रतिनिधी ) – माण तालुक्याचे मूळ रहिवासी असणारे व सध्या मुंबई येथे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले पत्रकार तुषार खरात यांच्याविरुद्ध एकापाठोपाठ एक दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज (दि. ९ मार्च २०२६) माण तहसीलदार कार्यालयासमोर “संविधान वाचन आंदोलन” आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते महेश करचे, डॉ. प्रसाद ओंबासे, शरद दडस यांनी दिली.

गतवर्षी काही व्यक्तींच्या तक्रारींवरून पत्रकार तुषार खरात यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी, खंडणी व विनयभंग यांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात त्यांना अटक करून तब्बल १०२ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र या संपूर्ण प्रकरणातील तपास प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून तपासामध्ये तथ्यात्मक विसंगती असल्याची चर्चा आहे. तसेच खोटे जबाब नोंदविण्यासाठी दबाव टाकल्याच्या तक्रारीही समोर आल्या असल्याचे सांगितले जाते. या संदर्भात पत्रकार तुषार खरात यांनी दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र आजपर्यंत या निवेदनावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर परिस्थिती ही लोकशाही मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास यांना बाधा पोहोचविणारी असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संविधानाने दिलेल्या शांततामय आंदोलनाच्या अधिकाराचा वापर करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी “संविधान वाचन आंदोलन” आयोजित करण्यात येत आहे. हे आंदोलन पूर्णतः शांततामय, अहिंसक व लोकशाही मार्गाने करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महेश करचे यांनी केले आहे.









