पालिकेच्या ऑनलाईन सभेविरोधात विरोधी पक्षनेत्या व शिवसेनेचे गटनेते यांनी भाजपवर केली ही टीका…

पुणे : पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज सत्ताधारी भाजपाकडून ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्याने त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर दालनात घोषणाबाजी देत ठिय्या आंदोलन केले. मुळातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही सर्वसाधारण सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावी असे सांगितले होते मात्र शासनाकडून लेखी आदेश आल्याशिवाय ही सभा ऑफलाइन होणार नसल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारीच स्पष्ट केले होते. Opposition leader and Shiv Sena group leader criticized BJP against the online meeting of the municipality …
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ८ फेब्रुवारी रोजी मुख्य सर्वसाधारण सभा २०० पटसंख्येच्या नियमावलीनुसार आणि कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करून घेण्याचे लेखी आदेश दिले होते. तरी सत्तेत असलेल्या भाजपने ऑनलाइन सभा घेऊन सरकारच्या आदेशाची पायमल्ली केली असल्याचा आरोप विरोधी पक्षातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला आहे.
याबाबत बोलताना विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी सांगितले की शासनाने ही सभा ऑफलाईन घेण्याचे स्पष्ट आदेश दिले असताना त्या आदेशाचे उल्लंघन करत सत्ताधारी भाजपने ही सभा ऑनलाइन घेतली. पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने चर्चा घडून आणायची नसल्यानेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने महापालिकेत सभागृह असताना महापौरांच्या अँटी चेंबरमधून ही ऑनलाइन सभा चालवण्यात आली हे नियमाला धरुन नसून निषेधार्ह आहे. कोरोनाच्या काळात सभा झाल्या नसल्याने बरेच विषय प्रलंबित आहेत. ऑफलाइन सभा घेतली तर विरोधक प्रश्नांचा भडिमार करतील या भीतीने सत्ताधारी भाजपने आजची सभा ऑनलाइन घेतल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.
शिवसेना पक्षाचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले की शासनाने ही सर्वसाधारण मुख्य भाग ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही सत्ताधारी भाजपने मनमानी कारभार करत ही सभा ऑनलाइन पद्धतीने घेतली. घेण्यात आलेल्या ऑनलाइन सभेला हवी तेवढी उपस्थितीही नसल्याचे दिसून आले. कोरोनाच्या काळात सभा झाल्या नाहीत. सर्वांनीच सहकार्य केले व कामे केली. मग त्यावेळी का ऑनलाइन सभा घेतली. आता परिस्थिती सुधारत असताना व शासनाने स्पष्ट आदेश दिले असतानाही बेकायदेशीरपणे सभा ऑनलाइन घेण्यात आल्याने आम्ही या गोष्टीचा निषेध केला आहे. शहराच्या प्रश्नांबाबत व विकासाच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांना चर्चा करायची नसल्यानेच ऑनलाइन पद्धतीने सभा घेण्यात आल्याचे सुतार यांनी सांगितले.




