धार पवार सरदारांचे भव्य स्मारक साकारले जाणार

रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर निष्ठा ठेवणाऱ्या धार पवार घराण्याचा मराठा साम्राज्यात पराक्रम हा सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असाच आहे. ह्या पराक्रमाचा वारसा पुढच्या पिढ्यांना समजावा म्हणून श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या वतीने छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खरकवाडी वाकी बुद्रुक या रायगडच्या पावन भूमीत असणाऱ्या गावात सर्व धार पवार सरदारांचे भव्य स्मारक साकारले जाणार आहे. या कामाच्या नियोजनाची सुरवात म्हणून आज श्रीमंत राजे पवार घरण्याच्या वतीने या ठिकाणी भेट देण्यात आली.
या प्रस्तावित स्मारकात श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र च्या वतीने एक ऐतिहासिक ग्रंथालय, एतिहासिक शस्त्र, धार पवार घरण्याचा सचित्र इतिहास, व छ्त्रपती चरणी निष्ठा ठेवत स्वराज्य स्थापने पासून अविरतपणे मराठा साम्राज्यचा दबदबा निर्माण करणाऱ्या पवार सरदारांचे भव्य शिल्प साकारले जाणार आहे.
त्याकरिता इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
सुनील पवार यांनी या नियोजित स्मारकासाठी साठी आपली जागा श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघटनेला दिली आहे. या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर पवार, उपाध्यक्ष रितेश पवार, कार्याध्यक्ष शेखर पवार , समन्वयक बाबाकाका पवार, उमेश वैद्य , राहुल पवार, ॲड राजन पवार, सचिन सीताराम पवार, सनीराजे सीताराम पवार, जयसिंगराव पवार, दत्ताराम पवार, केशव पवार, गणेश बणे , बणेराव पवार, वेदांत पवार हे धार पवार बंधु उपस्थित होते.



