वारजेत मोदींच्या संघर्षमय जीवन प्रवासावर प्रदर्शनाचे आयोजन

वारजे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमामध्ये मोदी यांचा संघर्षमय जीवनप्रवास, त्यांनी घेतलेले ऐतिहासिक निर्णय, सर्वसामान्यांसाठीच्या योजना अशा विविध मुद्दय़ांवर वारजे येथे आनोखे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
माजी नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर सचिव किरण बारटक्के यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले की , सेवा सप्ताह च्या माध्यमातून एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन याठिकाणी करण्यात आले आहे. या निमित्ताने मोदी सरकारच्या योजना व प्रेरणादायी जीवन प्रवास समाजापुढे यशस्वीपणे मांडण्यात आला आहे. मोदीजींच्या जीवन कार्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देशाला या संकटातून नक्की बाहेर काढेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार भिमराव तापकीर यांनीही या प्रदर्शनाला भेट दिली त्यांनी यावेळी प्रभाग ३२ मध्ये घेतलेल्या विविध कार्यक्रमांचे कौतुक केले व आगामी काळातही स्वच्छता मोहीम राबविण्याचे तसेच समाजातील दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले.
यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे सरचिटणीस गणेश घोष यांनी मोदी सरकारच्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. या प्रदर्शनास सोशल डिस्टंसीचे सर्व नियम पाळत नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,
या कार्यक्रमाच्या माध्यमातुन सर्व सामान्य नागरीकांसाठी असणाऱ्या केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना नागरीकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे बारटक्के यांनी सांगितले. यावेळी स्विकृत सभासद सचिन दांगट, दत्तात्रय चौधरी, अभिजीत धावडे, माधव देशपांडे, काका वाघमारे, मंदार रेडे व पदाधिकारी उपस्थित होते.




