रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रोला पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

बहुप्रतिक्षित रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेचं आज उद्घाटन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मार्गिकेचं उद्घाटन करण्यात आले. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा पुणे मेट्रो मार्ग-2 दुपारपासून सुरू होणार आहे.
पंतप्रधान लोकार्पण करत असलेल्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग सहा किलोमीटरचा असून 5 फेब्रुवारी 2024 रोजी या मेट्रोची ट्रायल रन झाली आहे.

यापूर्वी 6 मार्च 2022 रोजी पीसीएमसी ते फुगेवाडी या सात किलोमीटर आणि वनाज ते गरवारे या पाच किलोमीटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट 6.91 किलो मीटर आणि गरवारे ते रुबी क्लिनिक 4.75 किमी अशा मेट्रोच्या टप्प्यांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते 1 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले होते.
आज रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या सहा किलोमीटर मार्गाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले आहे. यावेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी, पुणे मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले.
पंतप्रधानांनी आज कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील या मेट्रो प्रकल्पांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सहभागी झाले होते.
रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईनपद्धतीने उद्घाटन करण्यात आले.पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रुबी हॉल ते रामवाडी या दोन मेट्रो गाड्या चालवणार आहेत.



उद्घाटनानंतर दोन तासांनी प्रवासी सेवा सुरू होईल, अशी माहिती पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली. दुपारी एकच्या सुमारास रुबी हॉलपूर्वी मेट्रो रामवाडीकडे रवाना होईल. रुबी हॉल ते रामवाडी हे अंतर साडेपाच किलोमीटर असून, उद्घाटनानंतर पुणे मेट्रो वनाज ते रामवाडी हे 15.7 किलोमीटरचे अंतर पार करणारी लाइन 2 पूर्ण करणार आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहभागी झाले
पंतप्रधान मोदींच्याच हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन
गेल्या पावणे दोन वर्षांपासून महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. रेल्वे आणि मेट्रोसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे, ज्याचा फायदा नागरिकांना होत आहे.आज लोकार्पण करण्यात आलेल्या पुण्यातील मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते, आणि आज त्यांच्याच हस्ते ही मेट्रो सेवा सुरू देखील झाली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.



वाढत्या शहरीकरणामुळे स्मार्ट आणि दर्जेदार वाहतुकीची गरज आहे. मेट्रो सेवेमुळे ही गरज पूर्ण होऊन इंधन आणि वेळेत देखील मोठी बचत होणार आहे.मोदींची गॅरंटी असलेले सर्व प्रकल्प आणि विकास कामे गतीने सुरू असल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.






