निवृत्तीवेतन धारकांचे दि.२७ रोजी मुंबईत धरणे आंदोलन

पुणे : निवृत्तीवेतन धारकांच्या मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवृत्तीवेतन धारकांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन दि.२७ डिसेंबर २०२३ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे धरून लक्षवेध दिन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एन डी मारणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कार्याध्यक्ष वसंत वाबळे, कोषाध्यक्ष अपर्णा कुलकर्णी, सरचिटणीस लक्ष्मण टेंबे या वेळी उपस्थित होते. राज्यातील शासकीय-निमशासकीय निवृत्तीवेतन धारकांच्या मागण्यांचे निवेदन दि.१६/११/२०२३ रोजी मुख्य मंत्र्यांना पाठविण्यात आले आहे, अशी माहिती एन डी मारणे यांनी दिली.

वयाची ८० वर्षे व त्यावरील वयाच्या निवृत्तीवेतन धारकांना मिळणाऱ्या अतिरिक्त निवृत्तीवेतनाचे दर सुधारीत करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. एकूण निवृत्तीवेतन धारकांपैकी केवळ ९ टक्के निवृत्तीवेतन धारक ८० वर्षाचा टप्पा पार करतात. ८० वर्षे वयावरील निवृत्तीवेतन धारकांतही ७० टक्के कुटुंबे निवृत्तीवेतन घेणारी आहेत. तरी, केंद्र शासनाने ज्या दिनांकापासून (१ जानेवारी २०१९) वाढ दिली त्या दिनांकापासून महाराष्ट्र राज्यातील वय ८० वर्षे व त्यावरील नीवृत्तीवेतन धारकांना केंद्र शासनाने दिलेल्या दराने त्वरित वाढ मंजूर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



राज्य शासनाच्या २०१६ पूर्वी निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतन धारकांची, सातव्या वेतन आयोगात काल्पनिक वेतन निश्चिती करून त्यांचे निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन सुधारीत करण्यात यावे, अशीही मागणी आहे. केंद्र शासनाने दि.१२ मे २०१७ रोजी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे, राज्य शासनाच्या २०१६ पूर्व निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना दि.१ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात यावा, अशी मागणी मुख्य मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
केद्र शासनाने विधवा मुलीला कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ देण्याचे मान्य केले आहे. त्याप्रमाणे राज्य शासनानेही विधवा मुलीला कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.



याखेरीज मुख्य मंत्र्यांकडे पाठविण्यात आलेल्या निवेदनात एकूण १५ मागण्यांचा समावेश आहे. आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना यांचा लाभ कुठल्याही अटीशिवाय निवृत्तीवेतन धारकांना देण्यात यावा, केंद्र सरकारप्रमाणे दरमहा वैद्यकीय भत्ता मिळावा, सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षकांना निवृत्तीवेतन १ ते ५ तारखे दरम्यान मिळण्याची व्यवस्था व्हावी, नगरपालिकांमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या देय असलेल्या सर्व रकमा मिळण्यासाठी १०० टक्के अनुदान शासनाकडून देण्यात यावे. गटविमा योजनेचा लाभ निवृत्तीनंतरही मिळावा आदी मागण्यांचा त्यात समावेश असून, या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी दि.२७ डिसेंबरचे धरणे आंदोलन सर्व संघटनांनी निश्चित केले आहे.






