पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गात बदल

पुणे : लष्कराकडून मान्यता न मिळाल्याने पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या खेड तालुक्यातून जाणाऱ्या दहा किलोमीटर मार्गात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे याच खेड तालुक्यातील लष्कराच्या जागेलगत नव्याने रेल्वे मार्ग प्रस्तावित केला आहे, त्यास मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
हायस्पीड रेल्वे पुणे-नाशिक शहरांसह पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतून जाणार आहे. या तीन जिल्ह्यांतील सुमारे एक हजार ४७० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रेल्वे कॉर्पोरेशनने हाती घेतला आहे. त्यापैकी प्रत्येकी वीस टक्के खर्च हा राज्य सरकार आणि केंद्रीय रेल्वे मंत्रालय करणार आहे. उर्वरित ६० टक्के निधी हा कर्ज रूपाने उभारण्यात येईल. तसेच, एप्रिल महिन्यात रेल्वे मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला निती आयोग आणि रेल्वे मंत्रालयाने अंतिम मान्यता दिली, त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्यात मोठा अडथळा दूर झाला होता.



