पुण्यात भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला २५ जागा?

पुणे : महापालिका निवडणुकीत महायुतीत शिवसेनेला २५ जागा देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्यात युती असणार आहे.
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत मात्र भाजपच्या नेत्यांवर आतापर्यंत उघडपणे टीका करणारे महायुतीतील शिवसेना (शिंदे) पक्षाचे महानगरप्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना पुणे महापालिकेच्या निवडणुकीतील जागा वाटपाच्या चर्चेपासून दूर ठेवण्यात आले आहे.

धंगेकर हे गेल्या अनेक दिवसांपासून मित्रपक्ष भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि अजय भोसले हे जागावाटपाची चर्चा करत आहेत.
माजी आमदार रवींद्र धंगकर यांना बैठकीला का निमंत्रण देण्यात आले नाही, याबाबत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले, ‘काही गोष्टी टाळाव्या लागतात. समंजसपणे विचाराने काही भूमिका घ्याव्या लागतात. भाजप आणि शिवसेनेत कोणतेही वाद नाहीत.’



