राज्यात 2017 पासून भरती घोटाळा; नवाब मलिकांचा आरोप

मुंबई : राज्यात 2017 पासून भरती घोटाळा सुरू आहे आणि त्याचे भाजप कनेक्शन पोलीस तपासातून उघड होत आहे, असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
मलिक म्हणाले, राज्यात भरती घोटाळा 2017 सालापासून सुरू झालेला आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया ऑनलाइन प्रणाली द्वारे करण्यात आली. या सगळ्यात व्यापम घोटाळ्यातले काही लोक सहभागी होते. त्या काळात आयकर विभागाचं काम बघणारे कौस्तुभ ठौसे यांची विशेष अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. ती नेमणूक बेकायदेशीर होती. एखादा बाहेरचा व्यक्ती फायली हाताळू शकत नाही. मागच्या सरकारने ज्या पद्धतीने विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली, त्यांच्या माध्यमातून सगळा घोटाळा करण्यात आला आणि त्याच्यात एक चतुराई दाखवण्यात आली होती. जर ते लोक सरकारी अधिकारी नसतील तर त्यांच्यावर भ्रष्टाचार विरोधी पथक कारवाई करू शकत नाही. त्यामुळे हे सगळं पूर्वनियोजितपणे विशेष अधिकारी नेमून घोटाळे करण्यात आले. चर्चेतून अनेक विषय समोर येतील. पुणे पोलिसांच्या तपासातून घोटाळ्याचं भाजप कनेक्शनही हळूहळू उघड होऊ लागलं आहे.







