पुण्यात एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर सुरू : उपशहर प्रमुख राजेश पळसकर यांचा शिवसेना ठाकरे पक्षाला राम राम…

पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे उपशहर प्रमुख राजेश पळसकर यांनी आपल्या पदाचा अचानक पक्षाकडे राजीनामा दिल्याने ते शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शहरातील मोठा पदाधिकारी शिंदे गटाकडे जात असल्याने एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर ची सुरुवात पुणे शहरात देखील सुरू केल्याचे बोलले जात आहे.
आज राजेश पळसकर यांनी आपल्या पुणे उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला असून ते येत्या 16 फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अनेक शिवसैनिकांसह प्रवेश करण्याची शक्यता आहे. पळसकर यांच्या माध्यमातून एक मोठा पदाधिकारी शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मिळाल्याने पक्षाची ताकद पुणे शहरात वाढण्यास मदतच मिळणार आहे.
मागील पंधरा दिवसांमध्ये शिवसेनेचे दोन माजी आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पुणे शहरावर लक्ष केंद्रित केल्याचे बोलले जात होते. उद्धव ठाकरे यांनी पुणे शहराला कायमच दुय्यम वागणूक दिल्याची कार्यकर्ते कायमच तक्रार करत आले आहेत. त्याचाच फायदा एकनाथ शिंदे घेत असून शिवसेना ठाकरे गटाचे चांगले पदाधिकारी आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात असल्याचे दिसत आहे. काही दिवसापूर्वीच शिवसेनेच्या पाच माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता, तर आता शिवसेनेचे इतर पदाधिकारी ही पक्षातून बाहेर पडत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुणे शहरात कुमकुवत बनत चालला असल्याचे चित्र आहे.

या संदर्भात राजेश पळसकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पक्षावर आलेल्या संकटकाळात देखील निष्ठावंत म्हणून पक्षासोबत राहिलो. परंतू अलीकडच्या काळात राजकीय महत्वकांक्षा मनात ठेऊन काही जन पक्षाची पदे, उमेदवाऱ्या मिळवून कार्यभाग साधून निघून जात आहेत, अशा पक्षाशी निष्ठा नसलेल्यांना मोठ्या पदावर घेण्याचा नवीन पायंडा काही नेत्यांकडून पाडला जात आहे. सध्या संघटनेत ” नव्यांना राम राम आणि निष्ठावंतांना थांब थांब… हि संकल्पना काही नेते राबवीत आहेत, ते माझ्या सारख्या शिवसैनिकाला न पटणारे
आहे. त्यामुळे आज शिवसेना पक्षातील माझ्या उपशहर प्रमुख शिवसेना, पुणे शहर पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना शिंदे गट प्रवेशावर विचारले असता त्यांनी त्याला दुजोरा दिला आहे.


