दुखापत झाल्यावर गार की गरम शेक? योग्य उपाय जाणून घ्या..

डॉ. सचिन नागापूरकर (अस्थिरोग तज्ञ)
अपघात होणे, घरात पडणे, चालताना ठेच लागणे, पायाचे किंवा हाताचे बोट आपटणे अशा घटना आपल्या दैनंदिन आयुष्यात खूप सामान्य आहेत. अशा वेळी असह्य वेदना, सूज किंवा स्नायू आखडणे यामुळे अनेक रुग्ण गोंधळात पडतात — गार पाण्याने शेकावे की गरम पाण्याने? बर्फ वापरावा की गरम पाण्याची पिशवी ? गरम इलेक्ट्रिकल बॅग जेल फोम बॅग की काय ? नेमके काय योग्य?
या प्रश्नाचे उत्तर दुखापतीच्या प्रकारावर आणि वेळेवर अवलंबून असते.

नवीन दुखापत (२४ ते ३६ तासांच्या आत)
जर नुकतीच दुखापत झाली असेल — उदा. मार लागणे, पडणे, मुरगळणे, सूज येणे — तर गार शेक (Cold Therapy) सर्वात फायदेशीर ठरतो. बर्फाची पिशवी (आइस बॅग) किंवा बर्फाचा गोळा कापडात गुंडाळून प्रभावित भागावर 10–15 मिनिटे शेकावा. गार शेकामुळे सूज कमी होते, रक्तस्राव आटोक्यात येतो आणि वेदना कमी होतात. अचानक गुडघा दुखणे, लचकणे किंवा सूज (swelling) आल्यासही गार शेक उपयुक्त ठरतो.
स्नायू आखडणे, कडकपणा (Stiffness / Soreness)
खांदा, कंबर किंवा इतर स्नायूंमध्ये कडकपणा, आखडणे किंवा स्पॅसम जाणवत असल्यास गरम शेक (Hot Therapy) अधिक परिणामकारक ठरतो. गरम पाण्याची पिशवी, इलेक्ट्रिकल हीट बॅग किंवा जेल फोम बॅग वापरू शकता. गरम शेकामुळे रक्तप्रवाह वाढतो, स्नायू सैल होतात आणि वेदना कमी होतात.
जुनी दुखणी (Chronic Pain)
जुनी वेदना, सततचा कडकपणा किंवा जुनाट दुखणे असल्यास साधारणपणे गरम पाण्याने शेकणे फायदेशीर असते. यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि हालचाल सुलभ होते.
लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे
नवीन सूज व दुखापत → गार शेक
स्नायू आखडणे / जुनाट वेदना → गरम शेक
बर्फ थेट त्वचेवर लावू नये d; नेहमी कापडाचा वापर करावा.
शेक 10–15 मिनिटांपेक्षा जास्त करू नये.
वेदना खूप तीव्र असतील, हालचाल शक्य नसेल किंवा सूज वाढत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
शेवटी, प्रत्येक दुखापत वेगळी असते. त्यामुळे स्वतः अंदाज न बांधता योग्य वेळी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणेच हिताचे ठरते.



गरम पाण्याने शिकण्याचे फायदे
रक्त प्रवाह वाढतो, रक्त वाहिन्या रुंद होतात, परिणामी त्या भागातील रक्त प्रवाह जास्त प्रमाणात होतो, स्नायूंना आराम मिळतो, ताण कमी होतो, स्टिफनेस ताठरपणा कमी करण्यासाठी मदत होते, वेदना कमी करण्यासाठी मदत होते, जुनी दुखणी कमी करण्यासाठी फायदा होतो.
थंड पाण्याने शिकण्याचे फायदे
स्वेलिंग सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. ब्लड प्रवाह मंद होतो, त्यामुळे जळजळ इन्फ्लमेशन स्वेलिंग सूज कमी करण्यासाठी मदत होते. लोकल एनेस्थीसिया सारखा परिमाण होतो वेदना कमी बधिरपणा येतो आणि वेदना कमी होतात कमी जाणवतात.
खेळ खेळत असताना वेदना होणे मार लागणे अश्या वेळी गार बर्फ शेकणे नक्कीच फायदेशीर ठरते.
टिप
ज्यांना हार्ट डिसीज आजार आहेत बीपी/ शुगर चे आजार आहेत त्यांनी आपल्या डॉक्टर चा सल्ला घेऊनच शेकणे करावे






