कसब्यात भाजपमध्ये श्रेयवादाची स्पर्धा

लोकसभा निवडणुकीत कसबा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मताधिक्य मिळाले. आता त्याचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ चालू झाली असून त्याबद्दल नाराजीचा सूरही उमटत आहे.
भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट सलग पाच वेळा कसबा मतदार संघातून निवडून आले. २००९ साली मतदार संघाची फेररचना झाली. त्या नंतरही बापट निवडून आले. २०१९ मध्ये मुक्ता टिळक याच मतदार संघातून विजयी झाल्या. त्यांचे निधन झाल्या नंतर २३ साली पोटनिवडणूक झाली आणि त्यात काँग्रेस पक्षाचे रवींद्र धंगेकर निवडून आले. हा पराभव भाजप नेत्यांना जिव्हारी लागला. त्यांनी लोकसभा निवडणुकीत जिद्दीने प्रचार केला. परिणामी कसब्यात भाजपला लीड मिळाला. पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला गेला.

कसब्यातील पिछेहाट भरून काढल्याने भाजपच्या गोटात आनंद झाला. मात्र, निकालानंतर मतदार संघात फलकबाजी, झाली. त्यातून विजयाचे श्रेय घेण्याची एकप्रकारे स्पर्धा लागली. फलकबाजीमुळे मतदारांचे मनोरंजन झाले.
गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव यांना हा श्रेयवाद पटला नाही. त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सवंग लोकप्रियता, फलक लावणे असे प्रकार गिरीश बापट यांनी कधी केले नाहीत, असे गौरव बापट यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत मते मिळतात, तेव्हा देशाचे नेतृत्व कोणाकडे सोपवायचे? वगैरे अनेक मुद्दे त्यामागे असतात, असेही मत त्यांनी मांडले आहे. कोणा एका व्यक्तीवर माझा रोख नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पण या पोस्टमुळे भाजपमधील अंतर्गत राजकारण ढवळून निघाले आहे.






























